छत्रपती संभाजीनगर शहरातील नागेश्वरवाडी या ठिकाणी हे महादेवाचे मंदिर आहे. शहरातील अतिशय प्राचीन मंदिरामध्ये या मंदिराचा समावेश होतो. मंदिराचे पुजारी योगेश मुंगीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंदिरामध्ये असलेली महादेवाची पिंड तब्बल हजार वर्षे जुनी आहे. या महादेवाच्या पिंडीवरती एक तांब्याचा पत्रा बसवलेला आहे. जेव्हा इतिहास अभ्यासकांच्या मदतीने हा तांब्याचा पत्रा बदलण्यात आला तेव्हा पिंडीच्या काळाबद्दल अधिक माहिती समोर आली.
advertisement
इतिहास अभ्यासकांच्या मते, ही पिंड तब्बल हजार वर्षे जुनी आहे. मोहेंजोदारो काळात जशी महादेवाची पिंड होती अगदी त्या पद्धतीची ही पिंड आहे. निजामापासून बचाव करण्यासाठी बडोदे (वडोदरा) सरकारचे सैन्य या मंदिरामध्ये लपले होते. बडोदे सरकारने महादेवाला साकडं घातलं होतं की, आम्ही जर इथून सुखरूप निघालो तर आम्ही मंदिर बांधू. जेव्हा बडोद्याचं सैन्य सुखरूप बचावले तेव्हा बडोद्याच्या सरकारने नागेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.
सुमारे 400 ते 500 वर्षांपूर्वी हे मंदिर बांधलेलं आहे. मंदिराची रचना वाड्याप्रमाणे असून त्यात सागाच्या लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिरातील नंदी एकदम महादेवाच्या पिंडीच्या शेजारीच आहे. याबाबत देखील एक आख्यायिका सांगितली जाते. निजामाने मंदिरा बाहेरचे नंदी मंदिरातच ठेवण्याचं फर्मान काढलं होतं. जर नंदी मंदिराबाहेर असेल तर मंदिर उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे या महादेवाच्या मंदिरामधील नंदी अगदी महादेवाच्या पिंडी शेजारी आहे. नवसाला पावणारा महादेव म्हणून नागेश्वर मंदिराची ख्याती आहे.