विनोद कुलकर्णी यांनी सांगितले की यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणार आहे. त्याच वेळेपासून महापुण्यकाळालाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे मकर संक्रांती 14 जानेवारीलाच साजरी करावी, असं त्यांनी सांगितलं आहे. यावर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे आणि हा काळ दुपारी 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत असणार आहे. तसेच या दिवशी गंगा स्नानाचा योग्य काळ सकाळी 9 वाजल्यापासून 10 वाजून 48 मिनिटांपर्यंत असल्याची माहितीही त्यांनी दिली. ज्योतिषशास्त्रानुसार या पुण्यकाळात दान, पूजन आणि धार्मिक विधी केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
का साजरी करायची मकर संक्रांत? का खायचे तिळगूळ? सणाचं नेमक महत्व काय? Video
मकर संक्रांतीचं महत्त्व..
हिंदू धर्मात मकर संक्रांतीला महत्त्वाचं स्थान आहे. या दिवशी पवित्र नद्या, तीर्थक्षेत्रे तसेच तलावांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी दानधर्म केल्यास पुण्य लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याच दिवशी सूर्यदेवाची देखील पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करून आपल्या पुत्र शनीदेव यांच्याकडे जातात, असे मानले जाते.
मकर संक्रांतीचा सण शेती आणि पीक कापणीशी जोडलेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. काही धार्मिक कथांनुसार, या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वीवर धर्माची स्थापना करून अधर्माचा नाश केला होता. तसेच राजा भागीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली आणि या दिवसापासून गंगा नदीला पतित पावन म्हणून ओळखले जाऊ लागले, अशीही मान्यता आहे.





