Somnath Temple: हिंदूचे ‘अखंड तीर्थ’ सोमनाथ, गझनी ते औरंगजेबाचे 17 हल्ले होऊनही कसे टिकून राहिले मंदिर? जिथे इतिहास हरतो अन् श्रद्धा जिंकते
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Why Somnath Temple Survived: गुजरातमधील प्रभास पाटन येथे 8 ते 11 जानेवारीदरम्यान ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ आयोजित करण्यात आले असून, या माध्यमातून सोमनाथ मंदिराच्या संघर्षमय इतिहासाला आणि अदम्य टिकावाला उजाळा दिला जात आहे. वारंवार झालेल्या आक्रमणांनंतरही श्रद्धा, ओळख आणि नेतृत्वाच्या बळावर सोमनाथ आजही अखंड उभा आहे.
advertisement
अरबी समुद्राच्या काठावर वसलेले सोमनाथ मंदिर हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या या मंदिराची ओळख केवळ श्रद्धेपुरती मर्यादित नाही. वारंवार झालेली आक्रमणे, विध्वंस आणि त्यानंतर उभे राहिलेले पुनर्निर्माण; या सगळ्यांमधून सोमनाथची खरी ओळख तयार झाली आहे. म्हणूनच या मंदिराला ‘अखंड तीर्थ’ असेही म्हटले जाते.
advertisement
सोमनाथची मुळे प्राचीन काळात जातात. पुराणकथेनुसार, चंद्रदेवाने तेज पुन्हा मिळवण्यासाठी येथे भगवान शिवाची उपासना केली. त्यावरूनच ‘सोमनाथ’ म्हणजेच चंद्राचा स्वामी असे या मंदिराचे नाव पडले. कपिला, हिरण आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर, थेट समुद्राला मिळणाऱ्या या स्थानामुळे मंदिराचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते.
advertisement
इतिहास पाहिला तर सोमनाथने अनेक संकटांचा सामना केला आहे. इ.स. 1026 मध्ये महमूद गझनीने मंदिरावर हल्ला करून प्रचंड लूट केली आणि गर्भगृह उद्ध्वस्त केले. त्यानंतर इ.स. 1299 मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने पुन्हा आक्रमण केले. 1395 मध्ये गुजरातचा सुलतान मुझफ्फर शाह पहिला आणि 1706 मध्ये औरंगजेबाच्या आदेशाने मंदिराचे पुन्हा विध्वंस झाले. मात्र प्रत्येक वेळी भौतिक नुकसान झाले तरी सोमनाथची आध्यात्मिक ओळख पुसली जाऊ शकली नाही.
advertisement
प्रत्येक विध्वंसानंतर सोमनाथ पुन्हा उभा राहिला. 12व्या शतकात चालुक्य राजा कुमारपालाने मंदिराचा भव्य पुनर्निर्माण केला. 14व्या शतकात चूडासमा घराण्यातील महिपाल पहिला यांनीही मंदिर पुन्हा उभारले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात, 1951 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून आधुनिक सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण झाले. तेव्हापासून सोमनाथ केवळ धार्मिकच नव्हे, तर राष्ट्रीय स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते.
advertisement
आज उभे असलेले सोमनाथ मंदिर पारंपरिक स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मंदिराच्या शिखरावर सुमारे 10 टन वजनाचा सुवर्णकलश आहे आणि त्यावरचा ध्वज दिवसातून तीन वेळा बदलला जातो. विशेष म्हणजे, मंदिराचा मुख्य शिखर असा रचलेला आहे की समोर थेट समुद्र असून, अंटार्क्टिकापर्यंत कोणतीही भूमी आड येत नाही, सोमनाथच्या अनंततेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते.
advertisement
सोमनाथ हे केवळ दगडांचे मंदिर नाही. ते श्रद्धा, सांस्कृतिक ओळख आणि सातत्य यांचे प्रतीक आहे. प्राचीन ग्रंथांपासून संत-कवींनी केलेल्या वर्णनांपर्यंत, तसेच भगवान श्रीकृष्णांनी देहत्यागापूर्वी येथे दर्शन घेतल्याची लोकश्रद्धा, या सगळ्यांमुळे सोमनाथचे महत्त्व अधिक वाढते. आज दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.
advertisement









