4 ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार असून, यावेळी भगवान शिवाच्या पिंडीवर तीळ अर्पण करण्याची परंपरा आहे. याला 'तीळकार' म्हणतात. यामागे धार्मिक, आध्यात्मिक आणि कृषी संस्कृतीशी संबंधित अनेक अर्थ दडलेले आहेत. श्रावण सोमवारी शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व आणि त्याचबरोबर तिळाचे महत्त्व काय आहे, याबद्दल आदित्य जोशी गुरुजींनी माहिती दिली आहे.
श्रावण महिन्यात शेतातील पिके शिजू लागतात, परिपक्व होतात, आणि त्यांचा उपयोग सुरू होतो. त्यामागील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ज्या अन्नधान्याचा उपभोग घेतो, त्यातील थोडा भाग प्रभू चरणी अर्पण करतो. हीच भावना 'शिवा मूठ' या परंपरेतून व्यक्त होते.
advertisement
Flower Rates: श्रावणात फूल बाजारात तेजी! झेंडू, शेवंती खातेय भाव, इथं पाहा सध्याचे दर
तीळ हे आरोग्यदायी आणि पवित्र मानले जाणारे धान्य आहे. त्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर तीळ अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, तीळ अर्पण केल्याने घरातील निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होते, सुख-समृद्धी नांदते आणि कर्ज कमी होण्यास मदत होते. तसेच, तीळ अर्पण केल्यामुळे ग्रहदोष, विशेषतः शनीसंबंधी त्रास शांत होतो, असे मानले जाते.
तिळाचे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व देखील मोठे आहे. तीळात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. म्हणूनच श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवाला तीळ अर्पण केल्यास मनःशांती लाभते आणि आर्थिक अडचणी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
तीळ अर्पण करताना ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा, अशी धार्मिक परंपरा आहे. मंत्रजपामुळे अर्पण केलेले तीळ अधिक प्रभावी ठरतात आणि त्याचा आध्यात्मिक लाभही अधिक मिळतो. यामुळे केवळ बाह्य पूजनच नव्हे, तर अंतःकरणातील भक्तीही व्यक्त होते.
यंदा दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट रोजी असून, या दिवशी शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळेल. त्या दिवशी भगवान शंकरावर तीळ अर्पण करून, ‘तीळकार’ केल्यास आपल्यावरील संकटे दूर होऊन सुख, समृद्धी आणि कर्जमुक्त जीवनाकडे वाटचाल होते.