यंदा पारंपरिक अध्यात्मिकता आणि भक्तिभावाचा हा महोत्सव गुरुवारपासून सुरू होत आहे. 19 डिसेंबर 2025 म्हणजेच जवळपास महिनाभर श्री विठुराया गोपाळपूर मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे विठुरायाच्या विशेष मुक्कामासाठी मंदिर समितीने दर्शन व्यवस्थेत सुधारणा केली असून रांगेसाठी मार्ग, पिण्याच्या पाण्याची सोय आणि वाहतूक नियोजनाची विशेष व्यवस्था केली आहे.
advertisement
काय आहे परंपरा?
दरवर्षी मार्गशीर्ष महिना सुरू झाला की, श्री विठ्ठलाचा मुक्काम पंढरीच्या मुख्य मंदिरातून गोपाळपूरच्या विष्णूपद मंदिरात हलवला जातो. आषाढी वारीनंतर चातुर्मास आणि नंतर येणारी कार्तिकी वारी यामुळे थकलेले विठुराया विश्रांतीसाठी विष्णूपद या ठिकाणी येतात, अशी परंपरा आहे. तसेच या ठिकाणी विठुराया आपल्या सवंगड्यांसह वनभोजनाचा आनंद घेतात, असंही सांगितलं जातं.
पंढरीच्या मंदिरात पुन्हा कधी?
गोपाळपूरच्या मंदिरात विश्रांतीनंतर विठुराया मार्गशीर्ष अमावस्येला पुन्हा पंढरीच्या मुख्य मंदिरात जातात. विष्णूपद या ठिकाणी त्या दिवशी संध्याकाळी एक रथ आणला जातो. रथ ज्वारीच्या ताटाने सजवला जातो. अभिषेक करून दिंडी देखील सजवली जाते आणि पुन्हा विठुराया पंढरीतील स्वगृही परत येतो आणि विराजमान होतो, अशी परंपरा आहे.






