नृसिंह सरस्वती यांचे वास्तव्य
श्री नृसिंह सरस्वती यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की, लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन 1441 मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले. त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले, असे जोशी सांगतात.
advertisement
Rose Farming Business : उच्चशिक्षित तरुणाची गुलाब शेती भारी, एक निर्णयाने पालटलं नशीब, कमाई तर पाहाच
कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचे गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे. भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबराच्या दाट शीतल छायेत नृसिंह सरस्वती यांनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करून दिले. औदुंबरक्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नृसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात.
कृष्णेचा डोह
औदुंबर येथील कृष्णेचा डोह रमणीय आणि लोभस असा आहे. अलीकडे श्री दत्तमंदिर आणि पैलतीरावर माता भुवनेश्वरी मध्ये कृष्णेचा डोह आहे. त्यावरून भाविकांना ने-आण करणारी नौका चालते. डोहातील पाणी कमी झाल्यावर सिध्दनाथाचे मंदिर दिसते. नृसिंह-सरस्वतींच्या निर्वाणदिनी फुलांनी सजविलेला पाळणा सोडला जातो. बाजूस सुंदर घाट बांधण्यात आला आहे.
भुवनेश्वरी मंदिर
औदुंबरच्या पैलतीरावरील श्री भुवनेश्वरी मंदिर आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. नृसिंह सरस्वती औदुंबर येथे आले. त्याही आधी भुवनेश्वरीमाता येथे वसली आहे. रम्य परिसर, दगडी रेखीव हेमांडपंथी मंदिर आहे. मंदिर परिसरात दगडी बुरूज, समोरील दगडी दिपमाळा, हनुमान, गणपती, काळभैरव, महादेवाची छोटी मंदिरे, प्रवेशद्वारे या मंदिराचा परिसर विलोभनीय जाणवतो. भिलवडी गावातून मंदिरापर्यंत मार्ग आहे. औदुंबरातील अवधूत नौकेतून कृष्णेचा डोह पार केला की मंदिराची दगडी वाट सुरू होते. मंदिर परिसर प्रशस्त आणि शांत आहे. देवीची मूर्ती साडेचार फूटी चक्रधारी आहे.
औदुंबर तीर्थक्षेत्री असे या
औदुंबर क्षेत्री जाण्यासाठी सांगली एसटी स्थानकावरून नियमित एसटी सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर मार्गावर हे क्षेत्र आहे. तर पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावर भिलवडी रेल्वे स्थानक आहे. या स्टेशनला उतरून बस किंवा खाजगी रिक्षेने 6 किमी अंतरावर असलेल्या औदुंबर या तीर्थक्षेत्री जाता येते. तर सांगलीपासून औदुंबर हे तीर्थक्षेत्र 25 किलोमीटर अंतरावर आहे. इथे भाविकांच्या राहाण्याची आणि जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. त्यासाठी धर्मशाळा आहे.





