पुण्यातील तुळशीबाग राम मंदिर परिसर हा मंदिरसमूह म्हणून ओळखला जातो. बुधवार पेठेत वसलेला हा भाग आज मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असला, तरी पूर्वी येथे बागा आणि शांत परिसर होता. मंदिर परिसरात एकूण चार मारुतींची मंदिरे आहेत आणि त्यातील एक म्हणजे खरकट्या मारुती. आकाराने लहान असलेले हे मंदिर इतिहास आणि परंपरेमुळे वेगळे महत्त्व प्राप्त झालेले दिसते.
advertisement
इतिहासानुसार, पेशवाईच्या काळात हा मारुती अस्तित्वात नव्हता. स्थानिकांच्या मते हे मंदिर साधारण शंभर वर्षांपूर्वीचे असावे. मारुतीची मूर्ती आकाराने लहान असून साधारण एक बाय एक फूट एवढी आहे. मूर्तीला पारंपरिक पद्धतीने शेंदूर लावलेला असून मंदिरात येणाऱ्या भाविकांचे लक्ष या साध्या पण वैशिष्ट्यपूर्ण मूर्तीकडे वेधले जाते.
तुळशीबाग परिसराचा इतिहासही तितकाच महत्त्वाचा आहे. पेशवाईच्या काळात हा भाग विविध बागांनी वेढलेला होता. सरदार फडणीस आणि सरदार खासगीवाल्यांच्या बागा येथे होत्या. नंतर नारो आप्पाजी खिरे यांनी सरदार खासगीवाल्यांकडून सुमारे एक एकर जागा विकत घेतली आणि त्या जागेवर राम मंदिर उभारले. परिसरात मोठ्या प्रमाणात तुळशीची लागवड असल्यामुळे या भागाला तुळशीबाग हे नाव पडले, असे सांगितले जाते.
या मंदिरसमूहात राम मंदिरासोबत दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर तसेच इतर लहान मंदिरेही पाहायला मिळतात. त्याच परिसरात असलेले खरकट्या मारुती मंदिर आजही भाविकांचे आकर्षण ठरते. पूर्वी परगावाहून पुण्यात येणारे लोक तुळशीबागेत उतरायचे आणि या मारुतीसमोर बसून जेवण करायचे. प्रवासात आणलेली शिदोरी उघडून जेवताना उरलेले अन्न किंवा खरकटे इथेच टाकले जात असल्यामुळे स्थानिक पुणेकरांनी या मारुतीला खरकट्या मारुती असे नाव दिले, अशी माहिती इतिहास अभ्यासक सुप्रसाद पुराणिक यांनी दिली.
आज तुळशीबाग परिसर गजबजलेला बाजार म्हणून ओळखला जात असला, तरी या ठिकाणी दडलेला इतिहास आणि स्थानिक संस्कृतीची परंपरा जपणारी अशी ही लहानशी पण वैशिष्ट्यपूर्ण जागा पुण्याच्या वारशाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. त्यामुळे पुण्यातील अनोख्या नावांच्या मारुती मंदिरांमध्ये खरकट्या मारुतीचे स्थान वेगळे ठरते.





