घुबड या पक्ष्याबद्दल अनेकांना भीती वाटते. काही जण तो अशुभही मानतात. त्याचा फोटो किंवा मूर्ती घरात ठेवण्याबद्दल अनेकांच्या मनात शंका असते. वास्तविक हिंदू धर्मात घुबड शुभ मानलं गेलं आहे. कारण घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. असं सांगितलं जातं, की घरात घुबडाची मूर्ती किंवा फोटो ठेवला, तर लक्ष्मीमाता प्रसन्न होते. तसंच, तिची कृपा कायम राहते. अर्थात, वास्तुशास्त्रानुसार ते ठेवलं तरच लक्ष्मीची कृपा होणं शक्य आहे. त्यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये घुबडाची प्रतिमा ठेवण्यासंदर्भात वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे, याबद्दल जाणून घेऊ या.
advertisement
घरात घुबडाचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची असेल, तर देवघर किंवा स्टडी रूम अर्थात अभ्यासाची खोली ही योग्य ठिकाणं आहेत. या ठिकाणी घुबडाची प्रतिमा लावल्यास घरात सकारात्मकतेचा अनुभव येतो. घरावर कोणाची वाईट नजर असेल, तर ती दूर होईल. घरात सुख-समृद्धी येईल.
घुबडाची प्रतिमा किंवा मूर्ती घरात अशा ठिकाणी ठेवू शकता, जिथून त्याची नजर घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर पडेल. घुबडाची नजर दरवाज्याच्या दिशेला असली, तर ते अधिक शुभ असेल, असं वास्तुशास्त्र सांगतं.
ऑफिसमध्येही घुबडाची प्रतिमा ठेवणं शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, ऑफिसमध्ये घुबडाची मूर्ती ठेवल्यास लक्ष्मीची कृपा कायम राहते. तसंच, कार्यक्षेत्रात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
ऑफिसमध्ये व्यवसायाशी निगडित वस्तूंच्या जवळ घुबडाची प्रतिमा ठेवली जावी, असं वास्तुशास्त्र सांगतं. काउंटरजवळ ठेवली तरी चालेल. एक गोष्ट लक्षात ठेवावी, की ऑफिसमध्ये घुबडाची प्रतिमा ठेवताना आपल्या उजव्या बाजूलाच असेल असं पाहावं. असं केल्यास कामात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगतीही होते, असं वास्तुशास्त्र सांगतं.