एक थक्क करणारा कॅच
मिचेल स्टार्कने इंग्लंडचा ओपनर जॅक क्रॉलीला बाद करण्यासाठी स्वतःच्याच बॉलिंगवर एक थक्क करणारा कॅच पकडला. डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये स्टार्कने फॉलोथ्रूमध्ये असताना डाव्या बाजूला झेप घेत एका हाताने हा कॅच टिपला. कॅच घेताना त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला, तरीही त्याने बॉल जमिनीला लागू दिला नाही.
advertisement
भेदक बॉलिंगने इंग्लंड चकित
मैदानी अंपायर्सने खात्री करण्यासाठी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला आणि रिप्लेमध्ये हा कॅच वैध असल्याचे सिद्ध झालं. हा 'रिटर्न कॅच' इतका जबरदस्त होता की, सोशल मीडियावर याला आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल असल्याचे म्हटलं जात आहे. वयाच्या 35 व्या वर्षी स्टार्कने भेदक बॉलिंग करत इंग्लंडला चकित केलं. तर कॅच घेऊन स्टार्कने मन देखील जिंकलं आहे. अशातच स्टार्कच्या कॅचनंतर मोहम्मद शमीची चर्चा सुरू झाली आहे.
फिटनेस आणि चपळता
सोशल मीडियावर शमी ट्रेंड होतोय. तर 35 व्या वयात मिचेल स्टार्कला संधी दिली जाऊ शकते तर शमीला का नाही? असा सवाल विचारला जात आहे. वयाच्या 35 व्या वर्षी स्टार्कने दाखवलेला हा फिटनेस आणि चपळता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्या अनुपस्थितीत त्याने पेस अटॅकचे नेतृत्व समर्थपणे केले आहे.
100 विकेट्सचा टप्पाही पार
दरम्यान, टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने टेस्ट क्रिकेटला प्राधान्य दिले आहे, ज्याचा मोठा फायदा आता ऑस्ट्रेलियाला होत आहे. पहिल्या डावात त्याने 7 विकेट्स घेत ऍशेसमध्ये 100 विकेट्सचा टप्पाही पार केला आहे. ऍशेसच्या इतिहासात एका डावात अशी सर्वोत्तम कामगिरी करणारा तो दुसराच ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ठरला आहे.
