पर्थ: अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीचा निकाल फक्त दोन दिवसात लागला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 8 विकेटने सनसनाटी विजय मिळून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव फक्त 172 धावांत संपुष्ठात आला होता. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला फक्त 132 धावात रोखले आणि आघाडी घेतली होती.
advertisement
इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी करेल असे वाटत होते. मात्र त्यांच्या फलंदाजांनी निराशा केली. इंग्लंडचा दुसरा डाव फक्त 164 धावात संपुष्ठात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात विजयासाठी फक्त 205 धावांचे लक्ष्य मिळाले.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात इंग्लंडला त्यांच्याच स्टाइलने उत्तर दिले. कसोटीत बेझबॉल खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडला त्याच प्रकाराने ऑस्ट्रेलियाने उत्तर दिले. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट 75 धावांवर गमावली. मात्र सलामीवीर ट्रेव्हिस हेडने टी-20 स्टाइलने फलंदाजी केली. त्याने फक्त 69 चेंडूत शतक पूर्ण केले. अॅशेस मालिकेतील हे सर्वात खास शतक मानले जात आहे. हेडने 83 चेंडूत 4 षटकार आणि 16 चौकारांसह 123 धावा केल्या. हेड बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलिया विजयाच्या जवळ पोहोचला होता. संघाच्या विजयाची औपचारीकता मार्नस लाबुशेनने अर्धशतकी खेळी करत पूर्ण केली.
ऑस्ट्रेलियाकडून दोन्ही डावात मिळून 10 विकेट घेणाऱ्या मिचेल स्टार्कला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या. सामन्या इंग्लंडच्या फलंदाजांनी अतिशय खराब कामगिरी केली. जो रुट सारखा अनुभवी फलंदाज पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात फक्त 8 धावा करून माघारी परतला. इंग्लंडने दुसऱ्या डावात फक्त 6 चेंडूत तीन विकेट गमावल्या. ज्यात ब्रूक आणि रुट यांच्या विकेटचा समावेश होता.
अॅशेस मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी- ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने विजय
दुसरी कसोटी- गाबा, 4 डिसेंबरपासून
तिसरी कसोटी- ओव्हल, 17 डिसेंबरपासून
चौथी कसोटी- मेलबर्न, 26 डिसेंबरपासून
पाचवी कसोटी- सिडनी, 04 जूनपासून
