मीरपूर: बांगलादेश आणि आयर्लंड यांच्यात मीरपूरच्या शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यादरम्यान एका अत्यंत अनपेक्षित घटनेमुळे खेळ थांबवण्याची वेळ आली. शुक्रवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भूकंपाचे धक्के जाणवल्याने हा कसोटी सामना तात्पुरता थांबवावा लागला.
advertisement
कमेंट्री बॉक्समधील समालोचकांनीही भूकंपाचे धक्के तीव्रतेने जाणवल्याचे सांगितले. या घटनेनंतर आयर्लंडचे खेळाडू तात्काळ त्यांच्या ड्रेसिंग रूममधून बाहेर आले आणि सुरक्षेसाठी सीमारेषेजवळ एकत्र उभे राहिले. स्टँड्समध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही हे धक्के अनुभवले ज्यामुळे काहीशी खळबळ उडाली होती. मात्र भूकंपाचे धक्के थांबल्यानंतर थोड्याच वेळात खेळ पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आला.
भूकंपाच्या आधी आयर्लंडचा संघ 5 बाद 98 धावांच्या अडचणीच्या स्थितीत होता. परंतु स्टीफन डोहनी आणि लॉर्कन टकर यांनी संयमाने फलंदाजी करत 81 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. या भागीदारीमुळे आयर्लंडचा संघ पहिल्या सत्रात 2 गडी गमावून 113 धावांपर्यंत मजल मारू शकला.
यापूर्वी दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्णपणे बांगलादेशच्या नावावर होता. अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम आणि लिटन दास यांच्या दमदार शतकी खेळीमुळे बांगलादेशने 5 बाद 340 वरून आपला डाव 476 धावांवर संपवला. या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी 123धावांची मोलाची भागीदारी केली. मुशफिकुर रहीमने 99 धावांवरून एक धाव घेत आपले 13वे कसोटी शतक पूर्ण केले, आणि विशेष म्हणजे आपल्या 100व्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो जगातील अकरावा क्रिकेटपटू ठरला. 100 धावांचा टप्पा गाठल्यानंतर मुशफिकुरला डेब्यूटंट मॅथ्यू हम्फ्रीजने 106 धावांवर बाद केले. दुसरीकडे लिटन दासनेही आक्रमकपणे खेळत एक षटकार आणि एक चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.
