PTV संघाने केवळ 40 धावांच्या टार्गेटचे यशस्वीपणे संरक्षण करत सामना जिंकला आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात कमी धावांचे यशस्वी डिफेन्स करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. या थरारक सामन्यात PTV ने सुई नॉर्दर्न गॅस संघाचा अवघ्या 2 धावांनी पराभव केला.
याआधीचा विक्रम तब्बल 1794 साली नोंदवला गेला होता. तेव्हा इंग्लंडमध्ये ओल्डफिल्ड संघाने लॉर्ड्स मैदानावर MCC विरुद्ध 41 धावांचे लक्ष्य संरक्षण करत 6 धावांनी विजय मिळवला होता. हा 232 वर्षे जुना विक्रम अखेर पाकिस्तानमध्ये मोडीत निघाला.
advertisement
अली उस्मानचा ऐतिहासिक स्पेल
या अविश्वसनीय विजयामागे डावखुरा फिरकीपटू अली उस्मान याची प्रमुख भूमिका होती. शनिवारी झालेल्या निर्णायक डावात उस्मानने 9 धावांत 6 विकेट्स घेतल्या आणि सुई नॉर्दर्नचा कणा मोडून काढला. त्यामुळे सुई नॉर्दर्न गॅस संघ फक्त 37 धावांत ऑलआउट झाला.
सामना कसा फिरला?
चार दिवस चाललेल्या या सामन्यात सुरुवातीला PTV ची स्थिती अत्यंत कमकुवत दिसत होती. पहिल्या डावात PTV संघ 166 धावांत गुंडाळला गेला. सुई नॉर्दर्नने 238 धावा करत 72 धावांची आघाडी घेतली
दुसऱ्या डावातही PTV फारशी चांगली कामगिरी झाली नाही. त्यांनी केवळ 111 धावा केल्या आणि एकूण आघाडी फक्त 40 धावांची मिळवली. PTV च्या हातातून मॅच निसटल्यासारखा वाटत होती. मात्र पुढे घडले ते क्रिकेट इतिहासात अजरामर ठरणारे होते.
अशक्य वाटणारा विजय
केवळ 40 धावांचे लक्ष्य, तेही चार दिवसांच्या सामन्यात, संरक्षण करणे जवळपास अशक्य मानले जात होते. पण PTV च्या गोलंदाजांनी अप्रतिम शिस्त, संयम आणि आक्रमकता दाखवत इतिहास घडवला. सुई नॉर्दर्नचा डाव अवघ्या 37 धावांत संपवून PTV ने क्रिकेटविश्वाला थक्क केले.
