होबार्ट: जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध आयपीएलच्या 2026च्या हंगामासाठी आज दुबई येथे मिनी लिलाव झाला. भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्याचे या लिलावावर लक्ष्य होते. लिलावात अनेक खेळाडूंना अनपेक्षितपणे मोठी बोली लागली. तर काही खेळाडूंना कोणीही संघात घेतले नाही. एका बाजूला आयपीएलची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या बीग बॅश लीगमधील एका सुटलेल्या कॅचची चर्चा क्रिकेट विश्वात सुरू झाली आहे.
advertisement
लीगमध्ये आज होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी थंडर यांच्यात मॅच झाली. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडरने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 180 धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या होबार्टच्या डावातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये असा काही ड्रामा झाला की चाहत्यांना हसावे की रडावे तेच कळेना.
होबार्टने पहिल्याच ओव्हरला 16 धावा करत दमदार सुरुवात केली होती. सिडनीकडून दुसरी ओव्हर डॅनियल सॅम्स टाकत होता. ओव्हरचा दुसरा चेंडू आणि फलंदाज होता निखिल चौधरी. सॅम्सने चेंडू मिडल स्टंपच्या दिशेने योग्य लेंग्थवर टाकला होता, पण चेंडू स्विंग झाला. चेंडू निखिल चौधरीच्या बॅटवर सरळ लागण्या ऐवजी तो टॉप-एज लागला आणि हवेत खूप उंच गेला.
चेंडू हवेत गेल्याचे दिसल्यावर सिडनीला दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट मिळणार असे सर्वांना वाटले. मात्र इथेच नेमका मोठा ड्रामा झाला. कॅच घेण्यासाठी डीप स्क्वेअर-लेगवर उभे असलेले तनवीर संघा आणि डेव्हिस दोघेही कॅचसाठी पोहोचले खरे. पण कॅचचा कॉल दोघांपैकी कोणीही घेतला नाही. मोक्याच्या क्षणी हे दोघे कॅच घेण्याचे सोडून एकमेकांकडे पाहत बसले की चेंडू कोण पकडणार आणि चेंडू दोघांच्या मधोमध खाली पडला. अर्थात ही संधी साधून फलंदाजाने एक रन काढून घेतली.
सहज पकडता येणारा कॅच सुटल्याने गोलंदाज डॅनियल सॅम्स संतापलेला दिसला. पुन्हा गोलंदाजीसाठी जाताना त्याच्या चेहऱ्यावरील निराश सर्वांनी दिसली. आपल्याला मिळालेल्या जीवनदानाची संधी निखिलने सोडली नाही. त्याने 31 चेंडूत 42 धावा केल्या. ज्यात 3 सिक्स आणि 1 फोरचा समावेश होता. ही मॅच होबार्ट अखेरच्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवर 4 विकेट राखून जिंकली.
