पहिल्या फेरीमध्ये गुकेशचा कार्लसनने 1.5-0.5 असा पराभव केला, पण यानंतर गुकेशने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या फेरीमध्ये नाकामुराचा 1.5-0.5 आणि तिसऱ्या फेरीमध्ये कारुआनाचा 2-0 असा पराभव केला. पहिल्या दिवसाच्या शेवटी गुकेश 4 पैकी 6 पॉइंट्ससह आघाडीवर होता. कार्लसन 3.5, नाकामुरा 3 आणि कारुआना 1.5 पॉइंट्ससह मागे होते.
गुकेशने बदला घेतला
याआधी झालेल्या एका सामन्यात हिकारू नाकामुराने गुकेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर गुकेशचा राजा प्रेक्षकांच्या दिशेने फेकला होता, यानंतर वाद निर्माण झाला. पण गुकेशने एकही शब्द न बोलता तसंच कोणतेही हावभाव न करता पराभव पचवला आणि पुढच्या काही दिवसांमध्येच त्याने या पराभवाचा बदला घेतला. सेंट लुईस येथे सुरू असलेल्या "क्लच बुद्धिबळ: चॅम्पियन्स शोडाउन" च्या पहिल्या दिवशी, भारतीय विश्वविजेत्या गुकेशने नाकामुराला 1.5-0.5 ने हरवले आणि शब्दांनी नाही तर कृतीने उत्तर दिले.
advertisement
गुकेश आणि नाकामुराच्या त्या सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला.
काही आठवड्यांपूर्वी, "चेकमेट: यूएसए विरुद्ध भारत" नावाच्या प्रदर्शनीय सामन्यात दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आले होते. जिंकल्यानंतर, नाकामुराने गुकेशचा राजा उचलला आणि तो प्रेक्षकांच्या दिशेने फेकला. यानंतर अनेक बुद्धिबळ प्रेमी आणि भारतीय चाहत्यांनी नाकामुराचं कृत्य खेळ भावनेविरुद्ध असल्याची टीका केली. नाकामुराने मात्र हा अपमान नव्हता, एखादी गंभीर स्पर्धा असती, तर कोणत्याच खेळाडूने असं केलं नसतं, असं स्पष्टीकरण दिलं होतं. पुढच्या वेळी तो हरला तर आपण बॉलीवूड गाणं गाऊ, असा टोलाही नाकामुराने लगावला होता.
"क्लच चेस: चॅम्पियन्स शोडाउन" हा सामना सेंट लुईस चेस क्लब, मिसूरी (यूएसए) येथे (25 ते 30 ऑक्टोबर) खेळला जात आहे. यात 9 फेऱ्या (एकूण 18 सामने) असतील, जे तीन डबल राउंड-रॉबिनमध्ये खेळले जातील. प्रत्येक फेरीत गुण आणि बक्षीस रक्कम वाढेल, दुसऱ्या दिवशी दुहेरी गुण दिले जातील.
एकूण बक्षीस रकमेपैकी $412,000 (अंदाजे ₹3.63 कोटी) $300,000 पेक्षा जास्त रक्कम स्थायी बक्षिसांसाठी राखीव आहे. पहिल्या चार खेळाडूंना अनुक्रमे $120,000 (₹1.06 कोटी), $90,000 (79 लाख), $70,000 (₹62 लाख) आणि $60,000 (53 लाख) मिळतील. याव्यतिरिक्त प्रत्येक राउंड-रॉबिन विजेत्यातला $1,000, $2,000 आणि $3,000 ची बोनस बक्षिसे देखील मिळतील.
