रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचा पहिला सामना जम्मू काश्मीरविरुद्ध बुधवारी सुरू झाला, पण या सामन्याआधीच मुंबईचा ऑलराऊंडर शिवम दुबे याला पाठीच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला, त्यामुळे तो मंगळवारी रात्री मुंबईमध्ये परतला आहे, अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्राने दिल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. शिवम दुबे टीमसोबत प्रवास करत होता, पण थंड हवामानामुळे त्याच्या पाठीची समस्या आणखीनच बिकट झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तो विश्रांती घेत आहे, त्यामुळे तो मंगळवारी मुंबईला परतला, असं एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
advertisement
गेल्या महिन्यात भारताच्या आशिया कप विजयात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली. स्पिनरविरुद्ध त्याची आक्रमक बॅटिंग टीमसाठी ट्रम्प कार्ड ठरली. भारतीय टी-20 टीमचा भाग असूनही, दुबे गेल्या काही हंगामांपासून मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळतो.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळला जाईल, त्यानंतर पुढील दोन सामने अॅडलेड आणि सिडनी येथे खेळले जातील. त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 सीरिज होईल. टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम 22 ऑक्टोबरला रवाना होईल. 29 ऑक्टोबरपासून टी-20 सीरिजला सुरूवात होणार आहे.
विराट-रोहितचं 7 महिन्यांनी कमबॅक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार आहेत. तब्बल 7 महिन्यांनंतर विराट आणि रोहित टीम इंडियाकडून मैदानात उतरणार आहेत. याआधी दोघंही चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये एकत्र दिसले होते. आता पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहण्याची भारतीय क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.