दुबई : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अपीलला धुडकावून लावत भारत-पाकिस्तान आशिया कप सुपर फोर सामन्यासाठी अँडी पायक्रॉफ्ट यांचीच रेफरी म्हणून नियुक्ती केली आहे. रविवारी (21 सप्टेंबर) दुबईत होणाऱ्या या सामन्यासाठी आयसीसीने अधिकृत घोषणा केली आहे. पीसीबीने पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने त्यांची एकही दखल न घेता त्यांनाच रेफरीची जबाबदारी दिली आहे.
advertisement
भारत-पाकिस्तान लीग स्टेज सामन्यावेळीही मोठा वाद झाला होता. पीसीबीने अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर 14 सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी फलंदाज आगा सलमान यांना नाणेफेकीदरम्यान किंवा सामन्यानंतर हस्तांदोलन करू नये, असे सुचवून खेळभावनेचा भंग केल्याचा आरोप केला होता.
आयसीसीच्या एलिट पॅनलमधील वरिष्ठ अधिकारी असलेल्या पायक्रॉफ्ट यांना जागतिक क्रिकेट संस्थेकडून मात्र क्लीन चिट देण्यात आली आहे. आयसीसीने स्पष्ट केले की- पायक्रॉफ्ट यांनी कोणतीही माफी मागितलेली नाही. पीसीबी आणि आशियाई क्रिकेट परिषद यांच्यातील वाद मिटल्यानंतर सामना ठरल्याप्रमाणेच खेळला जाईल, असे आयसीसीने सांगितले. परिणामी पायक्रॉफ्ट यांचीच सामना रेफरी म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे.
हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जिथे नो-हँडशेक विवाद झाला होता आणि जिथे पाकिस्तानी कर्णधार आगा सलमान सामना संपल्यानंतरच्या समारंभाला उपस्थित राहिले नव्हते.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असते. मात्र गेल्या रविवारी घडलेल्या घटनेनंतर हा तणाव आणखी वाढला आहे. त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि भारतीय संघाने प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हात मिळवण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघ रविवारी होणाऱ्या निर्णायक सामन्यातही शेजारील देशाविरुद्ध याच धोरणावर ठाम राहू शकतो.