नवी मुंबई: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ ची फायनल मॅच नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या मॅचवर पावसाचे सावट देखील आहे. अर्थात आयसीसीने फायनल मॅचसाठी उद्याचा दिवस राखीव ठेवला आहे.
advertisement
मैदानात सध्या पाऊस पडत नसला तरी मैदान अद्याप ओले आहे. नियोजित वेळेनुसार फायनल मॅच ३ वाजता सुरू होणार होती आणि त्यासाठी टॉस २ वाजून ३० मिनिटांनी होणार होता. आता मात्र टॉस आणि मॅचच्या वेळेत बदल झाला आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी दोन्ही अंपायर्स मैदानावर आले आणि त्यानंतर टॉस ३ वाजता होणार असल्याचे सांगितले तर मॅच ३.३० मिनिटांनी सुरू होणार असल्याचे जाहिर केले.
नवी मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे मैदानावरील काही भागात अद्याप पाणी आहे. त्याची पाहणी करण्यासाठी अंपायर्स आला होते. त्यांनी मैदानाची पाहणी केली. सीमारेषेवरील काही ठिकाणी पाणी साठलेले दिसते. मात्र मैदानावरील पाणी बाहेर टाकण्याची व्यवस्था चांगली असल्याने मैदान खेळासाठी तयार होण्यास वेळ लागणार नाही.
मॅच सुरू होण्याच्या काही वेळ आधी खेळपट्टीवरील कव्हर्स काढले जातात. मात्र पावसामुळे अद्याप कव्हर्स काढण्यात आलेले नाही. दुसरीकडे खेळाडूंनी देखील अद्याप मॅचसाठीची जर्सी घातलेली नाही. त्यामुळे सामना सुरू होण्यास वेळ लागण्याची शक्यता दिसत आहे.
