India vs Australia 1st T20i : ऑस्ट्रेलियाने वनडे मालिकेत भारताचा 2-1 ने पराभव केला होता. यानंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे.या मालिकेतला पहिला सामना उद्या 29 ऑक्टोबर 2025 ला खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श प्रचंड घाबरला आहे. कारण त्याला भारताच्या एका खेळाडूची प्रचंड भीती वाटते आहे.आता हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
पहिल्या टी20 सामन्याआधी ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श याची पत्रकार परिषद पार पडली आहे.या पत्रकार परिषदेत मिचेल मार्शने त्याची ही भीती बोलून दाखवली आहे. मार्शने मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत अभिषेक शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रभावी प्रगतीचे कौतुक केले. अभिषेक त्याच्यासाठी एक मोठे आव्हान असेल आणि तो त्यासाठी उत्सुक आहे हे त्याने मान्य केले.
"अभिषेक हा एक अविश्वसनीय प्रतिभा आहे. तो त्याच्या संघासाठी टोन सेट करतो आणि सनरायझर्स हैदराबादसाठी त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो निश्चितच आमच्यासाठी एक आव्हान असेल, परंतु तुम्हाला तेच हवे आहे, जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध स्वतःची चाचणी घ्या. आम्ही त्याची वाट पाहत आहोत.", असे मिचेल मार्शने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले.
अभिषेकची टी20 कारकीर्द
अभिषेक शर्माने त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात चांगली केली आहे. त्याने 23 डावांमध्ये 36.91 च्या सरासरीने 849 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तो सध्या 926 रेटिंग गुणांसह जगातील नंबर वन टी20 फलंदाज आहे.
मिचेल मार्शने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी जोश इंगलिस उपलब्ध असणार असल्याची देखील माहिती दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वासराच्या दुखापतीमुळे इंगलिसला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतून वगळण्यात आले होते. यावेळी मार्श म्हणाला, "इंगलिस पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि खेळण्यास तयार आहे. त्याला परत मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे; तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. मला वाटते की तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. आम्हाला त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवावे लागेल, पण हो, इंगलिस तयार आहे."
टी20 मध्ये मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावर पलडा भारी आहे. कारण दोन्ही संघांमध्ये खेळलेल्या 32 पैकी 20 सामने भारताने जिंकले आहेत. दरम्यान, 'मेन इन ब्लू' संघाने गेल्या तीन टी20 मालिका आणि 2024च्या टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
