पर्थ: उद्या रविवार 19 ऑक्टोबरपासून भारत–ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. पर्थमध्ये पहिली वनडे होणार असून सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या स्टार जोडीवर म्हणजेच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर केंद्रीत आहे. या दोघांनी 9 मार्च 2025 रोजी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच त्यांनी जून महिन्यात संपलेल्या आयपीएलनंतर कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेलं नाही.
advertisement
या मालिकेत दोघेही परतल्याने भारतीय संघाची ताकद दुप्पट होणार आहे. हे दोन स्टार संघात परतल्याने आता प्लेइंग 11 मधून कोणाला डच्चू मिळेल याची चर्चा सुरू झाली आहे.
भारताचा संभाव्य फलंदाजी क्रम
भारतीय फलंदाजी क्रम जवळपास निश्चित दिसत आहे. रोहित शर्मा आणि कर्णधार शुभमन गिल हे ओपनिंग करतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. उपकर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, तर के.एल. राहुल विकेटकीपर–फलंदाज म्हणून पाचव्या क्रमांकावर उतरेल.
नितीश कुमार रेड्डी या मालिकेत पदार्पण करण्याची शक्यता आहे. तो सहाव्या किंवा सातव्या स्थानावर खेळू शकतो. त्याच्यासोबत अक्षर पटेल असेल, जो संघाला बॅलन्स देऊ शकतो. जसप्रीत बुमराह या मालिकेत विश्रांतीवर असल्यामुळे, भारत गोलंदाजीमध्ये विकेट घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल का? की कोच गौतम गंभीर हे वॉशिंग्टन सुंदरला पसंती देतील? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचा हा पहिला आंतरराष्ट्रीय वनडे असून रोहित आणि कोहलीच्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यांनी सांगितलं की, ते पूर्णपणे वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरणार नाही. याचा अर्थ असा की मॅट कुन्हेमन, डावखुरा फिरकीपटू, आपल्या स्वतःच्या भूमीवर पहिला वनडे सामना खेळणार आहे.
दरम्यान प्रमुख फिरकीपटू अॅडम झॅम्पा आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे या सामन्यातून बाहेर आहे. त्यामुळे मॅट रेनशॉ आणि मिच ओवेन या दोघांना आपला वनडे पदार्पणाचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.
संभाव्य प्लेइंग 11
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (विकेटकीपर), अक्षर पटेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ:
ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅट शॉर्ट, मॅट रेनशॉ, जोश फिलिप (विकेटकीपर), मिच ओवेन, कूपर कॉनॉली, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅट कुन्हेमन, जोश हेजलवूड