भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या तिसऱ्या वनडेनंतर टीम इंडिया 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे, यानंतर 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. तसंच यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयपीएलला सुरूवात होऊन मे महिन्याच्या शेवटी आयपीएल संपणार आहे. म्हणजेच पुढचे काही महिने फक्त टी-20 क्रिकेट होणार आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे दोघंही न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिज आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार नाहीत. तर आयपीएलमध्ये दोघंही वेगवेगळ्या टीमकडून खेळतात, त्यामुळे आता विराट कोहली आणि रोहित शर्माला टीम इंडियाच्या जर्सीमध्ये थेट जुलै महिन्यात पाहायला मिळणार आहे.
advertisement
जुलै महिन्यात भारतीय टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे मॅच खेळेल. 14 जुलैपासून या सीरिजला सुरूवात होणार आहे, म्हणजेच विराट आणि रोहित भारताकडून आता थेट 177 दिवसांनी खेळणार आहेत.
विराट-रोहितचं वनडे वर्ल्ड कपवर लक्ष
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे ते आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहेत. 2027 साली दक्षिण आफ्रिकेमध्ये होणारा वनडे वर्ल्ड कप खेळण्याकडे विराट कोहली आणि रोहित शर्माचं लक्ष आहे.
न्यूझीलंडचा मोठा स्कोअर
3 वनडे मॅचची ही सीरिज 1-1 ने बरोबरीमध्ये आहे. पहिली मॅच भारताने जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात किवी टीमचा विजय झाला, त्यामुळे आता तिसरी मॅच दोन्ही टीमसाठी करो या मरो आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडने डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सच्या शतकांमुळे 337 रनपर्यंत मजल मारली. डॅरेल मिचेलने 137 तर ग्लेन फिलिप्सने 106 रनची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाला प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
