रायपूरमधल्या या शतकाच्या आधीच्या दोन इनिंगमध्ये विराटने 135 आणि नाबाद 74 रनची खेळी केली होती. विराटने लागोपाठ तीन वनडे सामन्यांमध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक रन करण्याची ही 13वी वेळ आहे. वनडे क्रिकेटमधला हा विश्वविक्रम आहे. यानंतर या यादीमध्ये रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर आहे. रोहितने 11 वेळा तर सचिनने 10 वेळा वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ 3 वेळा अर्धशतक किंवा त्यापेक्षा जास्तचा स्कोअर केला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटचं हे लागोपाठ 3 सामन्यांमधलं तिसरं शतक आहे. याआधी 2023 वनडे वर्ल्ड कपमध्येही विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यामध्ये शतक ठोकलं त्यानंतर रांची आणि आता रायपूरमध्ये विराटने शतकी खेळी केली आहे.
advertisement
मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमधून विराटने बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केलं होतं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या दोन वनडेमध्ये विराट शून्य रनवर आऊट झाला होता, त्यानंतर विराटचा फॉर्म आणि त्याच्या करिअरबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, पण विराटने त्याच्या बॅटनेच टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
विराट खेळणार विजय हजारे ट्रॉफी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजनंतर विराट कोहली देशांतर्गत स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी (वनडे) मध्ये खेळताना दिसणार आहे. आपण विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचं विराटने दिल्ली क्रिकेट असोसिएशनला सांगितलं आहे. निवड समिती, बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंट विराट आणि रोहित यांनी देशांतर्गत स्पर्धेमध्ये खेळावं, यासाठी आग्रही आहेत. सुरूवातीला विराट विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी तयार नव्हता, असं वृत्त होतं, पण आता विराटने त्याचा होकार कळवला असल्याचं स्पष्टीकरण दिल्ली असोसिएशनने दिलं आहे.
