जून महिन्यात झालेल्या इंग्लंड दौऱ्यासाठी करुण नायरची टीम इंडियात निवड झाली, याचसोबत त्याने 8 वर्षांनंतर भारतीय टीममध्ये कमबॅक केलं, पण या सीरिजनंतर त्याला टीम इंडियातून बाहेर करण्यात आलं.
करुण नायरने सोमवार 24 नोव्हेंबरला त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. 'काही परिस्थिती अशा असतात ज्या तुम्हाला मनापासून माहिती असतात आणि तिथे उपस्थित नसल्याची शांतता तुमचं दु:ख आणखी वाढवते', असं करुण म्हणाला आहे. टीम इंडियासोबत मैदानात न असण्याचं दु:ख करुणने त्याच्या या पोस्टमधून बोलून दाखवल्याची प्रतिक्रिया चाहत्यांनी दिली आहे.
advertisement
रणजीमध्ये करुण नायरचा धमाका
टेस्ट टीममधून बाहेर झाल्यानंतर करुण नायरने रणजी ट्रॉफीच्या 2025-26 च्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली आहे. कर्नाटककडून खेळत असलेल्या करुणने 5 सामन्यांमध्ये 100.33 च्या सरासरीने 602 रन केल्या आहेत. या कामगिरीनंतरही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली नाही.
कोलकाता टेस्टमध्ये वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली, तर गुवाहाटी टेस्टमध्ये साई सुदर्शन या क्रमांकावर खेळला. कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकला नाही, त्यामुळे टीम इंडियाची बॅटिंग आणखी कमजोर झाली. तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन आणि चौथ्या क्रमांकावर ध्रुव जुरेल यांच्यासारख्या अनुभव नसलेल्या खेळाडूंना बॅटिंगची संधी मिळाली, पण याचा फायदा त्यांना उचलता आला नाही.
करुण नायरने 2016 साली इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई टेस्टमध्ये नाबाद 303 रनची खेळी केली होती. आता भारतीय बॅटिंग पुन्हा एकदा गडगडत असताना चाहत्यांना करुण नायरची आठवण येत आहे. यावर्षी इंग्लंड दौऱ्यातही करुणच्या बॅटिंग क्रमवारीमध्ये सातत्य दिसलं नाही. करुण कधी तिसऱ्या क्रमांकावर तर कधी सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला.
करुण नायरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर करण्यात आलं, तेव्हा निवड समिती प्रमुख अजित आगरकरने यावर प्रतिक्रिया दिली होती. 'खरं सांगायचं तर आम्ही करुण नायरकडून जास्तची अपेक्षा केली होती. इंग्लंडमध्ये तो 4 टेस्ट खेळला आणि तुम्ही त्याच्या एका इनिंग (303) बद्दल बोलत आहात. या वेळी पडिक्कल जास्त पर्याय देईल, असं आम्हाला वाटत आहे. आम्ही प्रत्येक खेळाडूला 15-20 टेस्ट देऊ शकलो असतो, तर फार बरं झालं असतं', असं आगरकर म्हणाला होता.
करुण नायने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही, असं निवड समितीला वाटत आहे. पण आता साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळूनही त्यांना यश येत नाहीये, त्यामुळे निवड समितीने आता तरी करुण नायरसारख्या अनुभवी खेळाडूला संधी दिली पाहिजे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
