दक्षिण आफ्रिकेचा 489 धावांचा डोंगर
दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात तब्बल 489 धावांचा डोंगर उभा केला आहे. सेनुरन मुथुसामीने उत्कृष्ट फलंदाजी करत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आणि 109 धावा केल्या. त्याला मार्को जान्सेनची चांगली साथ मिळाली, जो दुर्दैवाने शतकापासून हुकला आणि 93 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने बिनबाद 9 धावा केल्या होत्या. सध्या भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेपेक्षा 480 धावांनी पिछाडीवर असून, तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे.
advertisement
80 ते 100 धावा कमी असतानाच डाव घोषित करा
भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या कठीण प्रसंगी रिषभ पंत आणि त्याच्या टीमला एक धाडसी सल्ला दिला आहे. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायची असेल, तर भारताला पारंपारिक खेळापेक्षा वेगळा विचार करावा लागेल, असे शास्त्री यांचे मत आहे. कॉमेंट्री दरम्यान बोलताना त्यांनी सुचवलं की, भारताने दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ओलांडण्याच्या फंदात पडू नये. त्याऐवजी, वेळेची बचत करण्यासाठी भारताने प्रतिस्पर्ध्याच्या धावसंख्येपेक्षा 80 ते 100 धावा मागे असतानाच आपला डाव घोषित करावा.
रवी शास्त्रींंचा मोलाचा सल्ला
शास्त्री यांच्या मते, तिसऱ्या दिवशी खेळाची दिशा ठरवणे महत्त्वाचे ठरेल. नवीन बॉल हाताळल्यानंतर भारताने आक्रमक निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर भारताने पूर्ण धावा करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात खूप वेळ जाईल आणि मॅच अनिर्णित राहण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे विजयासाठी थोडा धोका पत्करून, कमी धावांवर डाव घोषित करावा आणि दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करावा, असा मोलाचा सल्ला रवी शास्त्री यांनी दिला आहे.
