दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला तर टीम इंडियावर 2-0 ने व्हाईट वॉश व्हायची नामुष्की ओढवेल. याआधी मागच्या वर्षी न्यूझीलंडनेही घरच्या मैदानात भारताचा टेस्ट सीरिजमध्ये 3-0 ने पराभव केला होता. गौतम गंभीर टीमचा मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय टेस्ट टीमची कामगिरी कमालीची ढासळली आहे, त्यामुळे त्याच्या पदावरही टांगती तलवार आहे.
टीम सिलेक्शनवरून टीका
दुसरीकडे टेस्ट टीमच्या सिलेक्शनवरूनही कोच गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर निशाण्यावर आले आहेत. सरफराज खानने मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध 150 रनची खेळी केली होती, तसंच सरफराज खान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहे, पण न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये मोठा स्कोअर करूनही सरफराजला टीमबाहेर केलं गेलं.
मोहम्मद शमीने 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केली. तसंच सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्येही मोहम्मद शमी विरोधी टीमची बॅटिंग उद्ध्वस्त करत आहे, पण तरीही त्याची भारतीय टीममध्ये निवड होत नाहीये. तर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलं होतं, पण त्यानंतर संजूला वनडे क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही.
'टीम इंडियाची निवड प्रक्रिया म्हणजे सगळ्यात फिट व्यक्तीला उद्ध्वस्त करा. डारविनच्या विरोधात आणि विनच्या विरोधात अशी आहे', अशी संतप्त प्रतिक्रिया टीम इंडियाच्या सध्याच्या कामगिरीवरून चाहत्यांनी दिली आहे.
