पाचव्या टी-20 सामन्यात संजू अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला आला. संजूने 22 बॉलमध्ये 37 रनची खेळी करून टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली, पण जॉर्ज लिंडेने संजूला बोल्ड केलं, त्याआधी संजूने अंपायर रोहन पंडितला जखमी केलं.
डोनेवन फरेरा या दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनरने संजूला बॉल टाकला, या बॉलवर संजूने शक्तिशाली शॉट मारला जो थेट अंपायर रोहन पंडित यांच्या गुडघ्यावर जाऊन आदळला. यानंतर अंपायर रोहन पंडित जागेवरच कोसळले आणि वेदनेने विव्हळू लागले. अखेर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे डॉक्टर मैदानात आले आणि त्यांनी अंपायर रोहन पंडित यांच्यावर उपचार केले. संजू सॅमसनही धावत अंपायर रोहन पंडित यांच्या जवळ पोहोचला आणि त्याने माफीही मागितली. सुदैवाने रोहन पंडित यांची दुखापत गंभीर नव्हती. थोड्या उपचारानंतर ते लगेच उभे राहिले आणि सामना सुरू झाला.
मॅचच्या सुरूवातीला संजू सॅमसनने 1 हजार टी-20 आंतरराष्ट्रीय रनचा टप्पा ओलांडला. हा रेकॉर्ड करणारा संजू 14वा भारतीय खेळाडू ठरला. या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आघाडीवर आहे, ज्याने टी-20 मधून निवृत्ती घेण्याआधी 159 सामन्यांमध्ये 4,231 रन केल्या.
