टेस्ट क्रिकेटमध्ये ध्रुव जुरेल हा टीम इंडियाचा दुसऱ्या पसंतीचा विकेट कीपर आहे. ऋषभ पंत दुखापतीमधून बरा झाला नसल्यामुळे या सीरिजमध्ये ध्रुव जुरेलला संधी मिळाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या शतकानंतर जुरेलने त्याच्या संधीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 'मला खेळण्याची कमी संधी मिळते, पण तरीही मी टीमसोबत असतो, ही सन्मानाची गोष्ट आहे. किती खेळाडूंची टीममध्ये निवड केली जाते? आणि किती खेळाडूंना टेस्ट क्रिकेट खेळण्याची संधी मिळते', असं ध्रुव जुरेल म्हणाला आहे.
advertisement
फार संधी मिळत नसतानाही शतक केल्याबद्दलही जुरेलला प्रश्न विचारण्यात आला. 'मी खूश आहे, कारण मी टीमसोबत आहे. जर मी मॅच खेळत नसेन तरीही मी कठोर मेहनत करतो. एक दिवस मला संधी मिळेल, हे मला माहिती आहे, त्यामुळे मला स्वत:ला सर्वोत्तम कामगिरीसाठी तयार करावं लागतं. मी नेटमध्ये बॅटिंग करतो, जिममध्ये ट्रेनिंग करतो. मला संधी मिळू शकते, त्यामुळे मला अनुशासन पाळावं लागतं', अशी प्रतिक्रिया जुरेलने दिली आहे.
बॅटिंग करण्याआधी कीपिंग केल्यामुळे मला खेळपट्टी समजायला मदत झाली, असंही 24 वर्षांचा जुरेल म्हणाला आहे. 'मला बॅटर किंवा विकेट कीपर म्हणून खेळवणं माझा निर्णय नाही. माझं एकमेव काम रन करणं आहे. विकेट कीपिंग करताना तुम्हाला खेळपट्टी बघायला मिळते, खेळपट्टीचा अभ्यास करणं माझी सवय आहे, त्यामुळे कोणते आणि कसे शॉट खेळायचं हे मी विकेट कीपिंग करताना समजून घेतो', असं वक्तव्य जुरेलने केलं.
रूटने दिलेला सल्ला कामाला आला
ध्रुव जुरेलने त्याला इंग्लंडचा क्रिकेटपटू जो रूटने दिलेला सल्लाही कामाला आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 'मी इंग्लंड दौऱ्यावेळी जो रूटला भेटलो होतो. तो राजस्थान रॉयल्समध्ये आला होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. बॅटिंगमध्ये आणखी काय करू शकतो? असं मी जो रूटला विचारलं. त्याचं उत्तर सोपं होतं. सातत्याने चांगली कामगिरी करणं कठीण आहे, पण तुम्हाला प्रत्येक दिवशी सारखीच कामगिरी करावी लागेल, तेव्हाच निकाल तुमच्या बाजूने लागेल, असं रूटने मला सांगितलं', असं जुरेल म्हणाला.