दुबई: आशिया कपच्या सुपर फोरच्या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीत एक वादग्रस्त प्रकार झाला. दोन्ही देशात आधीच राजकीय संबंध तणावाचे असताना क्रिकेटच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. अशात पहिल्या सामन्यात नो-हॅडशेकवरून झालेला वाद संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चेत आला होता. आता पाकिस्तानच्या खेळाडूने थेट AK-47 celebration केल्याने मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे.
advertisement
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने अर्धशतक झळकावल्यानंतर अनोखी सेलिब्रेशन शैली दाखवून प्रेक्षक आणि सोशल मीडियावर खळबळ माजवली. फरहानने फक्त ३४ चेंडूत अर्धशतक केले आणि त्यानंतर त्याने बॅट बंदूकीसारखी पकडली आणि त्यातून गोळी मारत असल्याची अॅक्शन केली. फर्हानच्या या सेलिब्रेशनने सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. भारतातील राजकीय नेत्यांपासून ते सर्व सामान्य चाहत्यांनी त्याच्या या सेलिब्रेशनवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
फरहानच्या या कृतीनंतर सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली. भारतीय चाहत्यांसह इतर देशांतील क्रिकेटप्रेमींनीही त्याच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. भारत-पाकिस्तान सामन्यासारख्या हाय व्होल्टेज आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील सामन्यात असे वर्तन करणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. काही लोकांनी हे सेलिब्रेशन 'त्या क्षणातील आवेश' असल्याचे सांगून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण बहुतांश प्रतिक्रिया त्याच्या विरोधात होत्या.
काही महिन्यांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केला होता. अशा संवेदनशील वातावरणात फरहानच्या सेलिब्रेशनमधील 'प्रतीकात्मकता' अनेकांना खटकली. सोशल मीडियावर यावर प्रचंड टीका झाली.