एका पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये रोहित शर्माने केलेलं वक्तव्य म्हणजे गौतम गंभीरवर निशाणा असल्याचं बोललं जात आहे. माजी प्रशिक्षक राहुल द्रविडच्या कार्यकाळात सुरू केलेल्या प्रक्रियांचं पालन आम्ही केलं, त्यामुळे भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय झाला, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. रोहित आणि द्रविड यांच्या कार्यकाळात भारताचा 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभव झाला, यानंतर भारताने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर भारताने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, पण तेव्हा गौतम गंभीर टीमचा मुख्य प्रशिक्षक होता.
advertisement
काय म्हणाला रोहित शर्मा?
'मला ती टीम आणि त्यांच्यासोबत खेळणे आवडते. आम्ही सर्वजण अनेक वर्षांपासून या प्रवासात आहोत. हा एक-दोन वर्षांचा प्रयत्न नव्हता. हा एक दीर्घकालीन प्रयत्न आहे,' असे रोहितने सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यादरम्यान सांगितले. 'आम्ही अनेक वेळा ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचलो पण ते शक्य झाले नाही. तेव्हाच सर्वांनी ठरवले की आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे आणि त्याकडे पाहण्याचे दोन मार्ग आहेत. हे एक किंवा दोन खेळाडू करू शकत नाहीत. आम्हाला प्रत्येकाने हे स्वीकारण्याची गरज होती आणि सर्वांनी चांगले केले', असं रोहित म्हणाला.
'चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी सामने कसे जिंकायचे, स्वत:लाच कसं चॅलेंज द्यायचं आणि आत्मसंतुष्ट कसं व्हायचं नाही. काहीही गृहित कसं धरायचं नाही, याबद्दल विचार केला होता. जेव्हा आम्ही टी-20 वर्ल्ड कपची तयारी करत होतो, तेव्हा या प्रक्रियेने मला आणि राहुल द्रविडला खूप मदत केली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही आम्ही हाच फॉर्म्युला कायम ठेवला', असं वक्तव्य रोहितने दिलं. चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी गंभीर टीमचा मुख्य प्रशिक्षक होता, तरीही रोहितने या विजयाचं श्रेय द्रविडला दिलं आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला आवडते
ऑस्ट्रेलियामध्ये खेळणं आपल्याला खूप आवडत असल्याचंही रोहित म्हणाला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये खेळणं खूप आव्हानात्मक आहे, मला तिथे खेळण्याचा खूप अनुभव आहे, त्यामुळे तिथे कसं खेळायचं हे मला माहिती आहे, असं विधान रोहित शर्माने केलं आहे.