पुन्हा एकदा 19 नोव्हेंबरलाच रोहित शर्माचा हार्टब्रेक झाला आहे. आयसीसीने 19 नोव्हेंबरच्या दिवशी केलेल्या एका घोषणेमुळे रोहितसोबतच असंख्य भारतीय क्रिकेट चाहतेही नाराज झाले आहेत. रोहित शर्मा आता वनडे क्रिकेटमध्ये नंबर वन बॅटर राहिलेला नाही. न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेलने रोहित शर्माची नंबर वनची खूर्ची काढून घेतली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये धमाकेदार बॅटिंग केल्यानंतर डॅरेल मिचेल वनडे क्रिकेटचा नवा नंबर वन बॅटर बनला आहे, याचसोबत त्याने इतिहासही घडवला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये एक शतक आणि एक अर्धशतकाच्या मदतीने रोहित वनडेमध्ये नंबर वन बॅटर बनला होता.
advertisement
डॅरेल मिचेलने वनडे क्रिकेटच्या बॅटिंग क्रमवारीमध्ये दोन रँकिंगची उडी घेऊन थेट पहिला क्रमांक गाठला आहे. डॅरेल मिचेलचे सध्या 782 रेटिंग पॉईंट्स आहेत, तर रोहित शर्माचे 781 रेटिंग पॉईंट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा इब्राहिम झादरान आहे. डॅरेल मिचेलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 119 रनची खेळी केली, ज्यामुळे न्यूझीलंडचा 7 रननी विजय झाला.
मिचेलने इतिहास घडवला
डॅरेल मिचेल न्यूझीलंडचा वनडे क्रिकेटमधला दुसरा नंबर वन बॅटर बनला आहे. याआधी 1979 साली न्यूझीलंडचे महान खेळाडू ग्लेन टर्नर वनडे क्रिकेटमध्ये नंबर वन बॅटर बनले होते. मार्टिन क्रो, एन्ड्र्यू जॉन्स, रोजर ट्वोस, नॅथन एस्टल, केन विलियमसन, मार्टिन गप्तील आणि रॉस टेलर हे न्यूझीलंडचे बॅटर आयसीसी क्रमवारीत टॉप-5 मध्ये पोहोचले, पण त्यांना नंबर वन होता आलं नाही. 46 वर्षांनंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडचा बॅटर वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
