नवी मुंबई: आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025चा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय संघातील स्टार खेळाडू शेफाली वर्माला स्वत:च्या भावनांना आवर घालणे कठीण झाले. शेफाली वर्ल्डकपमध्ये भारतीय संघात नव्हती. खराब फॉर्ममुळे तिला संघातून वगळण्यात आले होत. मात्र अचानक संधी मिळाली आणि शेफालीला सेमीफायनल आणि फायनल अशा दोन लढती खेळण्याची संधी मिळाली.
advertisement
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत शेफालीने 87 धावा केल्या इतकेच नाही तर गोलंदाजीत 2 महत्त्वाच्या विकेट घेत संघाच्या विजयात सर्वात मोठे योगदान दिले. तिच्या या कामगिरीसाठी सामनावीर हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर बोलताना शेफालीने अत्यंत भावूक होत सांगितले, "मी सुरुवातीलाच म्हटले होते की, देवाने मला काहीतरी चांगले करण्यासाठी पाठवले आहे. आणि आज त्याचेच प्रतिबिंब पडले आहे. आम्ही अखेरीस वर्ल्ड कप जिंकलो, याचा मला खूप आनंद आहे. हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
हा प्रवास सोपा नव्हता. हे कठीण होते, पण माझा स्वतःवर विश्वास होता. मी स्वतःवर विश्वास ठेवेन. आणि जर मी स्वतःला शांत ठेवले, तर मी काहीही करू शकते. तो आत्मविश्वास आणि ती शांतता खूप महत्त्वाची होती, असे शेफालीने सांगितले.
या ऐतिहासिक विजयाचे श्रेय तिने आपल्या कुटुंबीयांना आणि मार्गदर्शकांना दिले. माझे पालक, माझे मित्र, माझा भाऊ... मला वाटते की प्रत्येकाचा खूप मोठा पाठिंबा होता. प्रत्येकजण मला कसे खेळायचे हे सांगत होता. आणि हा अंतिम सामना माझ्यासाठी, संपूर्ण संघासाठी किती महत्त्वाचा आहे, हे मला सतत जाणवून देत होते.
आज मी फक्त धावा कशा करायच्या, संघाने कसा जिंकायचा याच विचारात होते. हो, नक्कीच! आज माझे मन स्पष्ट होते. आणि मी मैदानात जाऊन माझ्या योजनांवर काम केले. त्या योजना यशस्वी झाल्याचा मला खूप आनंद आहे, असेल्याचे शेफालीने सांगितले.
कर्णधार हरमनप्रीत कौरसह संपूर्ण संघाने दिलेल्या पाठिंबा दिल्याचे तिने सांगितले. संघ माझ्याशी खूप बोलत होता. हरमन (हरमनप्रीत कौर) नेहमीच पाठिंबा देणारी होती. मला वाटते की प्रत्येकाने मला खूप पाठिंबा दिला. सर्व सहकारी खेळाडू खूप स्वागत करणारे आणि आधार देणारे होते. संघाने मोकळेपणाने सांगितले की, तुझा नैसर्गिक खेळ खेळ, तो सोडू नकोस. त्यामुळे जेव्हा तुम्हाला इतकी स्पष्टता मिळते, तेव्हा खूप आनंद होतो.
सचिन सरांकडून मिळाली 'वेगळी ऊर्जा'
वर्ल्ड कप विजयाचा हा क्षण अविस्मरणीय असला तरी, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांना पाहून मिळालेल्या उर्जेबद्दल तिने विशेष उल्लेख केला. हा माझ्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण आहे. पण जेव्हा मी सचिन सरांना पाहिले, तेव्हा मला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. मी सचिन सरांशी बोलत असते. ते नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवतात. मला वाटते की ते क्रिकेटचे 'मास्टर' आहेत. त्यांच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते. त्यांच्याशी बोलताना आणि त्यांना पाहून मला खूप प्रेरणा मिळाली.
