नवी मुंबई: आईसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चा अंतिम सामना रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात आला. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने विजेतेपद मिळवले. स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 104 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत पाया दिला. या जोडीची साथ स्मृतीच्या बाद झाल्यानंतर संपली. स्मृतीने 58 चेंडूत 45 धावा केल्या, ज्यामध्ये आठ चौकारांचा समावेश होता. त्यांचा विकेट दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर क्लो ट्रायॉनने घेतला.
advertisement
स्मृती बाद झाल्यानंतरही शेफाली वर्मा मात्र थांबली नाही. तिने आपल्या आक्रमक फलंदाजीने मैदान गाजवलं. शेफालीने केवळ 78 चेंडूत 87 धावा फटकावल्या, ज्यामध्ये सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. तिला आयाबोंगा खाकाने बाद केलं. ही शेफालीच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. जवळपास तीन-दीड वर्षांनी त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावलं.
शेफाली वर्मा सुरुवातीला वर्ल्ड कप संघाचा भाग नव्हती. मात्र प्रतीका रावल जखमी झाल्यानंतर तिच्या नशिबाने कलाटणी घेतली. प्रतीका रावलला बांग्लादेशविरुद्ध लीग सामन्यात फील्डिंग करताना गुडघा आणि टाचेला दुखापत झाली होती. ज्यामुळे ती वर्ल्ड कपमधील नॉकआउट सामन्यांमधून बाहेर झली. तिच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शेफाली वर्माला संघात सामील करण्यासाठी आयसीसीकडे (ICC) परवानगी मागितली होती आणि ती मंजूर करण्यात आली.
या पुनरागमनानंतर शेफाली वर्माने आपली छाप जबरदस्तपणे उमटवली. जवळपास एक वर्षानंतर पुन्हा भारतीय वनडे संघात परतली. जेव्हा तिला टीम इंडियाकडून कॉल आला, तेव्हा ती सूरतमध्ये सीनियर महिला टी-20 ट्रॉफी खेळत होती. तत्काळ मुंबईला रवाना होत वर्ल्ड कप संघात सहभागी झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत त्या केवळ 10 धावा करून बाद झाल्याने अनेकांना वाटले शेफाली संघासाठी ओझे ठरेल. त्यानंतर अंतिम सामन्यात शेफालीने शानदार फलंदाजी करत चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा आपली खास जागा निर्माण केली.
फक्त 21 वर्षांच्या शेफाली वर्मा आजपर्यंत भारतासाठी तीन टी-20 वर्ल्ड कप आणि दोन वनडे वर्ल्ड कप खेळल्या आहेत. भारताने जेव्हा पहिला अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकला होता, तेव्हा शेफाली त्या संघाच्या कर्णधार होती. आज शेफालीने फक्त फलंदाजीत नाही तर गोलंदाजीत कमाल करुन दाखवली. शेफालीच्या हातात जेव्हा कर्णधार कौरने चेंडू दिला तेव्हा कोणाला वाटले देखील नसेल शेफाली ही भारताच्या गोलंदाजीची मुख्य धार असेल. शेफालीने आज सात ओव्हरमध्ये 36 धावा देत 2 विकेट घेतल्या. पहिल्या 5 ओव्हरमध्ये तिने 19 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.
शेफाली वर्मा ही एकदिवसीय विश्वचषकातील पुरुष किंवा महिलांच्या उपांत्य फेरीत किंवा अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू आहे. तिने २१ वर्षे २७९ दिवस असताना अशी कामगिरी केली आहे.
आतापर्यंत शेफाली वर्माने 5 कसोटी, 30 वनडे आणि 90 टी-20 सामने भारतासाठी खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 63.00 च्या सरासरीने 567 धावा केल्या आहेत, ज्यात 1 शतक आणि 3 अर्धशतकं आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 31 सामन्यांत 24.70 च्या सरासरीने 741 धावा आणि 5 अर्धशतकं आहेत. तर महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी 26.12 च्या सरासरीने 2221 धावा केल्या असून, 11 अर्धशतकं झळकावली आहेत.
