श्रीनगर: रणजी ट्रफीच्या एलिट ग्रुपमध्ये मुंबई संघाने जम्मू आणि काश्मीरवर 35 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. मुंबई संघात अजिंक्य रहाणे, सर्फराज खान, शार्दूल ठाकूर सारखे टीम इंडियाकडून खेळलेले खेळाडू आणि तुषार देशपांडे, आयुष म्हात्रे, मुशीर खान असे IPL स्टार संघात असताना शम्स मुलानीच्या ऑलराउंडर कामगिरीच्या जोरावर मुंबईने थरारक विजय साकारला.
advertisement
रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध जम्मू संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात मुंबईने सर्व बाद 386 धावा केल्या होत्या. यात सिद्धेश लाडच्या 116 धावांच्या शतकी खेळीचा तसेच शम्सच्या 91 धावांचा समावेश होता. जम्मू संघाला पहिल्या डावात 325 धावा करता आल्या. मात्र दुसऱ्या डावात मुंबईचा डाव कोसळला. मुंबईला फक्त 181 धावा करता आल्या. यात सर्वाधिक 41 धावांचे योगदान शम्स मुलानीचे होते.
जम्मूला दुसऱ्या डावात विजयासाठी 242 धावांची गरज होती. मात्र शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीसमोर जम्मू-काश्मीरचा डाव 207 धावात संपुष्ठात आला. मुंबईकडून शम्स मुलानी एकट्याने 7 विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. शार्दूल, तुषार देशपांडे आणि तनुश कोटियन यांनी प्रत्येक एक विकेट घेतल्या.
मुंबई संघात टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळलेले स्टार खेळाडू असताना शम्सने धमाकेदार कामगिरी करून संघाला विजय मिळून दिला. त्याने संपूर्ण मॅचमध्ये 9 विकेट आणि 132 धावा केल्या. मुंबईच्या या पहिल्या विजयाने ग्रुप डीमध्ये ते 6 गुणांसह अव्वल स्थानावर गेले आहेत.