गुवाहाटी : ICC महिलांच्या वर्ल्ड कप 2025मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. इंग्लंड महिला संघाविरुद्ध झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने शानदार विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश केला. त्यांनी इंग्लंडला उपांत्य सामन्यात तब्बल 125 धावांनी पराभूत केले. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने सर्वच विभागांमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्कृष्ट कामगिरी केली. दक्षिण आफ्रिका आता आपल्या स्वप्नापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
advertisement
पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये...
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट इतिहास फार जुना आहे. परंतु आजवर त्यांच्या महिला संघाला किंवा पुरुष संघाला कधीच वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचता आले नव्हते. ते अनेक वेळा उपांत्य फेरीत पोहोचले, मात्र अंतिम फेरी गाठू शकले नव्हते. हा पहिलाच प्रसंग आहे, जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम सामन्यात खेळणार आहे. आता त्यांच्या महिला संघासमोर इतिहास रचण्याची मोठी संधी आहे. हा अंतिम सामना जिंकून देशासाठी पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावण्याची.
अशी झाली मॅच...
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 7 गडी गमावून 319 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 320 धावांचे भक्कम लक्ष्य ठेवले.
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या महिला संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी केवळ 1 धावांवर तीन गडी गमावले. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी झाली. पण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत इंग्लंडचा डाव 42.3 षटकांत 194 धावांवर गुंडाळला.
इंग्लंड महिला संघाचे या वर्ल्ड कपमधील आव्हान इथेच संपुष्टात आले, तर दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत दाखल झाली. आता फायनलमध्ये त्यांचा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्या संघाशी होईल.. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना 30 ऑक्टोबरला खेळवला जाईल.
