भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारीला टी-20 वर्ल्ड कपचा सामना होणार आहे. दोन्ही टीममध्ये श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये आर प्रेमदासा स्टेडियमवर मॅच होईल, पण बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तान या सामन्यात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ शकते. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचीही भेट घेतली आहे.
आयसीसी पासून वाचण्यासाठी पाकिस्तानची आयडिया
advertisement
जर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला तर आयसीसीसोबतच ब्रॉडकास्टर्सही पीसीबीला अडचणीत आणू शकतात. तसंच पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रतिबंधही लागू शकतात, यातून वाचण्यासाठी पाकिस्तान मार्ग काढत आहे. पाकिस्तानी मीडिया डॉनने दिलेल्या वृत्तानुसार टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकणं ही मुख्य प्राथमिकता नाही, पण पाकिस्तान 15 फेब्रुवारीच्या भारताविरुद्धच्या सामन्यातून माघार घेऊ शकते. यासाठी पीसीबीकडे ठोस आधार आहे, ज्यामुळे त्यांच्यावर आयसीसीची कोणतीही कारवाई होणार नाही.
हा निर्णय बोर्डाने नाही तर सरकारने घेतला आहे, असं पीसीबी आयसीसीला सांगू शकतं. आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही देशाच्या क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, पण राष्ट्रीय सुरक्षा आणि सरकारी आदेशाचं कारण देऊन पाकिस्तान भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू शकते. सरकारी आदेशानुसार आम्ही भारताविरुद्ध खेळणार नाही, असं सांगितलं तर आयसीसीकडून कारवाई होणार नाही, असं पाकिस्तानला वाटत आहे.
आयसीसीचा तोटा करण्याचा हेतू
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नातं कायमच तणावपूर्ण राहिलं आहे. मागच्या वर्षी दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही टीम मागची बरीच वर्ष फक्त आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात, त्यामुळे या सामन्यातून आयसीसीला मोठी स्पॉन्सरशीप आणि ब्रॉडकास्टिंग रेव्हेन्यू मिळतो, याच कारणामुळे आयसीसीचं आर्थिक नुकसान करण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे.
