टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सगळ्यात मोठा मॅच विनर कोण ठरेल? याबाबत रोहित शर्माने भाकीत वर्तवलं आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या आधी स्टार स्पोर्ट्सने रोहित शर्मासोबत खास कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामध्ये बोलताना रोहित शर्माने टीम इंडियातल्या स्पेशल प्लेअरबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
तिलक वर्मा हा टीम इंडियाचा सगळ्यात मोठा मॅच विनर असल्याचं रोहित म्हणाला आहे. 'मला वाटतं तिलकमध्ये वेगळी गोष्ट आहे, त्याचा दृष्टीकोन खूप चांगला आहे, त्याचं टेम्परामेंटही सुपर आहे. आशिया कप फायनलमध्ये तिलकने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ते अविश्वसनीय होतं. तिलकच्या त्या खेळीमध्ये मॅच विनर खेळाडूची झलक पाहायला मिळाली. तो भारताचा सगळ्यात मोठा मॅच विनर आहे, हे त्याने दाखवून दिलं', असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
advertisement
तिलक वर्माची आशिया कप फायनलमध्ये ऐतिहासिक खेळी
तिलक वर्माने साडेतीन महिन्यांपूर्वी झालेल्या आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक खेळी केली होती. या सामन्यात भारताने 20 रनमध्येच अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादवची विकेट गमावली होती, यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडली, पण तिलक वर्माने 53 बॉलमध्ये नाबाद 69 रन केले आणि पाकिस्तानच्या हातातून विजय खेचून आणला. या खेळीबद्दल तिलकला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
तिलकवर शस्त्रक्रिया
टी-20 वर्ल्ड कपआधी तिलक वर्माच्या दुखापतीने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी तिलक वर्मावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, यातून फिट होण्यासाठी त्याला तीन ते चार आठवडे लागू शकतात, त्यामुळे तो टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार का नाही? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
