श्रीनगरमध्ये मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यात रजणची ट्रॉफीचा सामना झाला, या सामन्यात भारताचा फास्ट बॉलर तुषार देशपांडेची प्रकृती अचानक बिघडली आणि तो मैदानातच 10 सेकंद बेशुद्ध झाला, यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. ब्रॉन्कायटिस वाढल्यामुळे तुषार देशपांडेला हा त्रास झाला, यानंतर स्थानिक डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले.
श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर पहिल्या दिवसाच्या वॉर्मअप वेळी तुषार देशपांडेला श्वास घ्यायला त्रास होत होता. स्टेडियमची उंची आणि ऑक्सिजनचा स्तर कमी असल्यामुळे तुषार देशपांडेला त्रास झाला, यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तुषार देशपांडे हा सामना खेळणार नाही, असं वाटत होतं, पण त्याने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी केली.
advertisement
जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात तुषार देशपांडेने 35 ओव्हर बॉलिंग केली, ज्यात त्याने 4 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. या कामगिरीनंतर राजस्थानने तुषार देशपांडेचं कौतुक केलं आहे. 'ही माझ्यासाठी महत्त्वाची मॅच होती, मागच्या सिझनला जम्मू-काश्मीरने आम्हाला पराभूत केलं होतं, त्यामुळे या सिझनची सुरूवात आम्हाला चांगली करायची होती. दीड वर्षानंतर मी रणजी ट्रॉफीमध्ये कमबॅक करत होतो, त्यामुळे माझ्यासाठीही ही मोठी गोष्ट होती', असं तुषार देशपांडे राजस्थान रॉयल्ससोबत बोलताना म्हणाला.
'मॅचआधी वॉर्मअप वेळी मी 10 सेकंद बेशुद्ध झालो होतो, पण टीमसाठी खेळण्याच्या इच्छाशक्तीने मी उठलो', अशी प्रतिक्रिया तुषार देशपांडेने दिली. या सामन्यात जम्मू-काश्मीरचा कर्णधार आणि अनुभवी बॅटर पारस डोगराने 144 रनची खेळी केली, पण तरीही जम्मू-काश्मीरला विजय मिळवता आला नाही. पहिल्या इनिंगमध्ये मुंबईला 61 रनची आघाडी मिळाली, जी शेवटी महत्त्वाची ठरली. यानंतर मुंबईचा 35 रननी विजय झाला. तुषार देशपांडेने मागच्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केलं होतं.