मुंबई : भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहासाला गवसणी घातली आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 52 रननी पराभव केला. दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांच्या ऑलराऊंड कामगिरीमुळे भारताला वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं, त्याआधी सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्याविरुद्ध मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने झुंजार शतक केलं, त्यामुळे भारताने 339 रनचं अशक्य वाटणारं आव्हान पार केलं.
advertisement
सेमी फायनलमधल्या या खेळीनंतर जेमिमा रॉड्रिग्जला अश्रू अनावर झाले, तसंच स्टेडियममध्ये असलेल्या तिच्या कुटुंबाचे अश्रूही अनावर झाले. आता फायनलमध्ये टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या यशाच्या भावना शब्दात व्यक्त करण्यापलीकडच्या आहेत, अशी प्रतिक्रिया जेमिमा रॉड्रिग्जच्या वडिलांनी दिली आहे.
काय म्हणाले जेमिमाचे वडील?
'लहानपणी देशासाठी खेळण्याचं आणि वर्ल्ड कप जिंकण्याचं माझं स्वप्न होतं. माझं हे स्वप्न माझ्या लेकीने पूर्ण केलं. मी तिचा फक्त वडीलच नाही तर कोचही राहिलो. तिचं यश शब्दात व्यक्त करण्यापलीकडे आहे', अशी प्रतिक्रिया जेमीमाच्या कुटुंबाने दिली आहे.
'स्वप्न पूर्ण झालं आहे. 1983 प्रमाणे भारतीय महिला क्रिकेट वेगळ्या स्तरावर नेलं आहे. मी वडील आणि कोच या दोन्ही भूमिका बजावल्या. सहावीमध्ये असताना तिने मैदानावर विजय खेचून आणला. ती हॉकीदेखील खेळायची. 14 व्या वर्षी ती मुंबईसाठी खेळायला लागली. ऑस्ट्रेलियाच्याविरुद्ध मॅच खेळणं मोठं आव्हान होतं, कारण ऑस्ट्रेलिया 7 वेळा चॅम्पियन राहिले आहेत. तुझा अॅटिट्युट महत्त्वाचा आहे, तुम्ही जिंकाल, असं मी जेमिमाला सांगितलं', असं जेमिमाचे वडील म्हणाले आहेत.
जेमिमाने मोठा संघर्ष करून हे यश संपादन केलं आहे. मुलीला आम्ही पाठिंबा दिला. ती चुळबुळी आहे, काहीतरी वेगळं करेल, काहीतरी चांगलं होईल हे आम्हाला नक्की माहिती होतं. आम्ही तिच्यावर विश्वास ठेवला. महिला क्रिकेटला फ्युचर नाही म्हणून 2 कोच पळून गेले, पण मग आम्ही स्वत: ट्रेनिंग सुरू केली, असं जेमिमाच्या वडिलांनी सांगितलं.
