एलिसा हिली यंदाच्या लिलावातली सगळ्यात महागडी खेळाडू ठरेल, अशी अपेक्षा होती, पण एकाही टीमने तिच्यासाठी बोली लावली नाही. लिलावाच्या पहिल्या राऊंडमध्ये एलिसा हिलीवर बोली लागली नसली तरी शेवटच्या टप्प्यातल्या फास्ट ऑक्शनमध्ये हिलीवर बोली लागण्याची शक्यता आहे, पण मार्की खेळाडूंच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर असूनही हिलीवर बोली न लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
advertisement
35 वर्षांच्या हिलीने तिच्या डब्ल्यूपीएलच्या कारकिर्दीमध्ये 17 सामने खेळले आहेत, ज्यात तिने 26.75 च्या सरासरीने आणि 130.49 च्या स्ट्राईक रेटने 428 रन केले आहेत. एलिसा हिलीवर बोली न लागल्यानंतर पुढच्या काही क्षणांमध्ये न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन डब्ल्यूपीएलच्या यंदाच्या मोसमात बोली लागलेली पहिली खेळाडू ठरली. आरसीबीने रिलीज केलेल्या सोफी डिव्हाईनला गुजरात जाएंट्सने 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.
दीप्ती शर्मा सगळ्यात महागडी
भारताला वनडे वर्ल्ड कप जिंकवणारी दीप्ती शर्मा लिलावामधली सगळ्यात महागडी खेळाडू ठरली आहे. दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सनी 3 कोटी 20 लाख रुपयांमध्ये आरटीएम कार्ड वापरून विकत घेतलं. डब्ल्यूपीएलच्या इतिहासात आरटीएम कार्ड वापरून टीममध्ये आलेली दीप्ती शर्मा ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. दीप्ती शर्मावरही सुरूवातीला कोणत्याच टीमने बोली लावली नव्हती, त्यानंतर दिल्लीचा प्रशिक्षक सौरव गांगुलीने दीप्तीवर 50 लाखांची बोली लावली, त्यानंतर यूपी वॉरियर्सनी दीप्तीसाठी 3 कोटी 20 लाखांचं आरटीएम कार्ड वापरलं.
