बदलापूर-कर्जत प्रवास करणाऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणारच आहे परंतू मुंबई अन् पुणे प्रवास करणाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊयात हा नेमका प्रकल्प कसा असेल? शिवाय नेमका या प्रकल्पाचा खर्च किती होणार?
बदलापूर ते कर्जत मार्ग प्रवास होणार सोपा...
बदलापूर–कर्जत या तयार होणाऱ्या साधारण 32 किलोमीटरच्या तिसरी आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला केंद्राने मंजुरी दिली आहे. या विस्तारित मार्गिकेमुळे रेल्वे वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून गाड्यांचा वेग आणि प्रवासाची व्याप्तीही सुधारणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
बदलापूर–कर्जत विभाग हा मुंबई उपनगरीय कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग असल्याने या प्रकल्पामुळे उपनगरीय दळणवळण व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेमुळे भविष्यातील प्रवासी मागणी पूर्ण करता येईल तसेच दक्षिण भारतासोबतची रेल्वे जोडणीही अधिक सक्षम आणि सुलभ होण्याची शक्यता आहे.
बदलापूर – कर्जत मार्गाची वैशिष्ट्ये कोणती?
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण यामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल ट्रेनची गर्दी कमी होईल. बदलापूर – कर्जत मार्गाची लांबी ३२ किलोमीटर आहे आणि यावर 8 मोठे पूल, 106 लहान पूल तर 1 रोड अंडर ब्रिज तसेच 6 रेल्वे स्थानके आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत 1,324 कोटी रुपये असून ही रक्कम रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात 50:50 प्रमाणात वाटली जाणार आहे.
फायदे काय होतील?
बदलापूर – कर्जत तिसरी आणि चौथी मार्गिका तयार झाल्यानंतर मुंबई लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट फायदा होईल. यामुळे मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणार्यांची सुविधा सुधारेल तसेच अधिक प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या चालवणे शक्य होईल. या भागातील औद्योगिक वाढीमुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी होतील. अंदाजानुसार दरवर्षी 7.2 दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक होईल, तर दरवर्षी 41 लाख लिटर डिझेल वाचून लॉजिस्टिक खर्चात सुमारे 46.2 कोटी रुपये बचत होईल
