ठाण्यातील गांधीनगर परिसरात ही घटना घडली होती. शैलेंद्र संतोष यादव असं या परप्रांतीय रिक्षा चालकाचं नाव आहे. किरकोळ कारणावरून रिक्षाचालक शैलेंद्र यादव आणि एका मराठी तरुणामध्ये बाचाबाची झाली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिक्षाचालक भानावर आला आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement
'मी शैलेंद्र संतोष यादव, हात जोडून विनंती करतो आण सॉरी म्हणतो. काल गांधी नगर इथं मनसेच्या शाखेसमोर रिक्षा लावत होतो. त्यावेळी एका माणसासोबत माझा वाद झाला. वादातून भांडणं झालं होतं. त्यानंतर राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याबद्दल बोलताना माझ्या तोंडातून अपशब्ध निघाले. त्याबद्दल मी हातजोडून माफी मागतो. या पुढे असं काही करणार नाही. मी एक रिक्षावाला आहे, रिक्षा चालवून घर कसंबसं चालवतो. मी या पुढे अशी कोणतीही चूक करणार नाही. मी दारूच्या नशेत होतो, त्यामुळे मी असं बोललो. त्यामुळे हात जोडून माफी मागतो, असं म्हणत या रिक्षाचालकाने कान धरून उठबश्या मारल्या.
मनसेसैनिक मात्र अजूनही आक्रमक
मात्र, या रिक्षाचालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरली होती. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण, मनसैनिकांच्या हाती लागण्याआधीच या परप्रांतीय रिक्षा चालकाने पोलीस स्टेशन गाठले आणि शरणागती घेतली. मात्र, मनसैनिक अजूनही संतापलेले असून याला मनसे स्टाईल उत्तर देण्यावर मनसैनिक ठाम आहे.
