नेमकं कसं घडलं?
17 नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला होता. त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन्स दिल्याची माहिती देण्यात आली.
पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. 3 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र 16 डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबिजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
advertisement
परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबिजची लक्षणे दिसणे हे गंभीर स्वरूपाचे असून उपचार पद्धती, औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण व संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे, असे ॲड. रोहिदास मुंडे यांनी नमूद केले.
या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच दिवा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
