दादरमधील श्री दुर्गा देवी नवरात्र उत्सव मंडळाने यंदाच्या नवरात्र उत्सवासाठी एक अत्यंत आकर्षक आणि भव्य देखावा साकारला आहे. या देखाव्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि मुंबईतील काही प्रसिद्ध देवींच्या प्रतिकृती एकाच ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. हे मंडळ प्लाझा सिनेमाच्या मागे स्थित असून यंदा मंडळाच्या स्थापनेला ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाने उभारलेल्या देखाव्यात प्रमुख शक्तिपीठांमध्ये तुळजाभवानी (तुळजापूर), रेणुका माता (महूर), श्री सप्तशृंगी देवी (वणी) आणि अर्ध शक्तिपीठ असलेली महालक्ष्मी देवी (कोल्हापूर) यांच्या देखाव्यांचा समावेश आहे. यासोबतच मुंबईतील सुप्रसिद्ध मुंबादेवी, एकवीरा देवी (लोणावळा), काळूबाई (मंदर्डे) आणि जीवदाणी देवी (विरार) यांच्या देखाव्यांचाही समावेश आहे. मंडळाचे व्यवस्थापक सांगतात की नवरात्रीत अनेक लोकांना विविध ठिकाणी जाऊन देवींचे दर्शन घेणे शक्य होत नाही. गर्दी, वेळेअभावी, तसेच काही वेळा प्रवासाची अडचण असल्यामुळे अनेक भाविकांना इच्छा असूनही सगळ्या देवींचे दर्शन घेता येत नाही. म्हणूनच यंदा मंडळाने हा विशेष देखावा साकारत श्रद्धाळूंना सर्व देवींचे दर्शन एकाच ठिकाणी घेण्याची संधी दिली आहे.