
पुणे : शहराच्या मध्यवर्ती कॅम्प परिसरात आजही परंपरेचा ठसा जपून ठेवणारा गवळी वाडा हजारो पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. ब्रिटिशकालीन छावणी उभारली गेली तेव्हा सैनिक आणि अधिकाऱ्यांच्या अन्नपुरवठ्यासाठी भाजीपाला, मटण, धुणीभांडी आणि दूध यांची गरज होती. त्यावेळी गवळी समाजाला येथे स्थायिक होण्यासाठी जागा देण्यात आली आणि गोठे उभारण्याची मुभा देण्यात आली. कमी शुल्कात व्यवसाय करण्याची परवानगी देत या भागाला संघटित स्वरूप देण्यात आले. त्यातूनच कॅम्पमधील गवळी वाड्याची स्थापना झाली.