प्रमोद पाटील, नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात एक प्रवाशी एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म जाताना पादचारी पुलाचा वापर न करता ट्रॅक वरून गेला. मात्र ट्रॅक पार करण्याआधीच लोकल आली आणि एकच खळबळ उडाली. चालकाने अनेक हॉर्न दिले गाडीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही सदर प्रवाशी रेल्वे खाली आलाच. प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मध्ये अडकला. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभ्या प्रवाशांना तो जिवंत असल्याचे लक्षात येताच चालकाला लक्षात आणून दिले. मात्र गाडीची आणि त्याची स्थिती अशी होतो की चालक गाडी ना पुढे घेऊ शकत होता ना मागे, शेवटी उपस्थित प्रवाशी आणि रेल्वे कर्मचारी यांनी मिळून गाडीला अक्षरशः उचललं आणि अडकलेल्या प्रवाशाला बाहेर काढलं. प्रवाशाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे. सदरची घटना सोमवारी दुपारी 3 वाजता घडल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलं. या घटनेने एकीचे बळ काय असते याचे प्रत्यय दाखवून दिले.