रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प जिंकल्यास ते शेअर बाजारांसाठी सकारात्मक ठरू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, या उलट निकाल लागल्यास ती शेअर बाजारांसाठी वाईट बातमी असेल. महिन्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी 10:47 वाजता भारतीय बाजारात जोरदार विक्री झाली. निफ्टी 50 380 अंकांनी (1.55 टक्के) घसरला आणि सेन्सेक्स 1,138 अंकांनी (1.43 टक्के) घसरला होता.
advertisement
सट्टेबाजांच्या अंदाजानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे. मात्र एमके ग्लोबलला सतत अस्थिरतेची शक्यता दिसतेय. एमकेच्या मते, ट्रम्प आणि कमला हॅरिस दोघांपैकी कोणीही जिंकल्यास काही प्रमुख क्षेत्रांमध्ये समान परिणाम दिसतील. जागतिक चलनवाढ आणि विकासात अस्थिरता वाढण्याचे संकेत आहेत. डेमोक्रॅटिक पक्ष जिंकल्यास मागणी व विक्री वाढेल. मात्र रिपब्लिकन पक्ष जिंकल्यास अल्पकाळात बाजारात तेजी येईल. फर्मच्या मते, निवडणुकीत कोणीही जिंकलं तरी भारताला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
ट्रम्प सत्तेत आल्यास काय होईल?
एमके ग्लोबलच्या ताज्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यास कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलासा मिळेल आणि नियामक भार कमी होईल. निकाल याउलट लागल्यास यूएसमध्ये खर्चासाठी परिस्थिती खूप वाईट असेल, मात्र ती बाँड्ससाठी चांगली असेल.
"ट्रम्प राष्ट्रपती झाल्यास जास्त अस्थिरता येईल. मात्र हॅरिस राष्ट्रपती झाल्यास काही बाबतीत परिस्थिती सारखीच असेल. मध्यम टप्प्यातील कालावधीत - जागतिक चलनवाढ आणि विकासात लक्षणीय अस्थिरतेची शक्यता आहे, याचा अर्थ 'बाय द डिप' किंवा 'टाइम रॅली' सारख्या पारंपरिक गुंतवणुकीच्या धोरणांचा पुन्हा विचार करावा लागेल," असं रिपोर्टमध्ये म्हटलंय.
एमकेने म्हटलं, “अमेरिकेत रेड स्वीप झाल्यास अमेरिकन शेअर्सच्या वाढीचे परिणाम भारतीय बाजारावर दिसतील. मात्र चीनच्या बाजारात अनिश्चिततेमुळे घसरण होईल जी भारतासाठी एफपीआय (फॉरे पोर्टफोलियो इनव्हेस्टमेंट) दृष्टीकोनातून फायद्याची ठरू शकते. मात्र जागतिक व देशांतर्गत स्तरावर ही रॅली टिकवून ठेवणं आव्हानात्मक असेल. रेड स्वीपमुळे अल्पकाळात तेजी येऊ शकते, मात्र त्याची स्थिरता कमाईतील मजबुती आणि व्हॅल्युएशनवर अवलंबून असेल, जी आता कमकुवत आहे."
कमला हॅरिस जिंकल्यास काय होईल?
कमला हॅरिस जिंकल्यास विक्री वाढू शकते आणि पाच टक्के घसरणीनंतर खरेदीची संधी तयार होऊ शकते. एमकेच्या मते, याचा भारतीय अर्थव्यवस्था व बाजारावर फार परिणाम होणार नाही. मध्यम टप्प्यातील काळात भारतावर डेमोक्रॅट किंवा रिपब्लिक सत्तेत आल्याने फारसा फरक पडणार नाही.
"भू-राजकीय दृष्टिकोनातून भारतासाठी अमेरिकेशी असलेल्या संबंधांबद्दल हा एक आव्हानात्मक काळ आहे," असं एमके ग्लोबलने म्हटलंय. कोणता उमेदवार जिंकतो यावर आव्हानांचे स्वरूप अवलंबून असेल. हॅरिस जिंकल्यास बायडन यांच्या धोरणात सातत्य राहील. तर ट्रम्प जिंकल्यास सर्वात मोठे आव्हान टॅरिफ असेल. मात्र त्यांचे मुख्य टार्गेट चीन आहे. पण त्याचा भारतावर परिणाम होऊ शकतोअसंही तज्ज्ञांचं मत आहे.
