जम्मू आणि काश्मीर या भारतीय केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही मुद्दे भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय स्तरावर सोडवायचे आहेत. ही आमची दीर्घकाळची राष्ट्रीय भूमिका आहे. या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. आपणा सर्वांना माहीत आहे की, पाकिस्तानने भारताचा जो भूभाग बेकायदेशीरपणे ताब्यात घेतला आहे. तो परत करणे हा महत्त्वाचा विषय आहे, असे मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.
advertisement
ट्रम्प यांना मिरची झोंबली, भारताकडून अमेरिकेच्या हुकमी एक्क्यावर घाव
जैस्वाल यांचा रोख अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याकडे होता. ट्रम्प यांनी दावा केला होता की अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीसाठी मध्यस्थी केली होती. तर भारताने यावर जोर दिला होता की पाकिस्तानच्या डीजीएमओंनी 10 मे रोजी त्यांच्या भारतीय समकक्ष अधिकाऱ्याला फोन करून शस्त्रसंधीची विनंती केली होती.
जैस्वाल म्हणाले, 10 मे 2025 रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंच्या फोनवरील संभाषणात शस्त्रसंधीच्या समजुतीची विशिष्ट तारीख, वेळ आणि शब्दरचना निश्चित झाली. या कॉलची विनंती पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाकडून परराष्ट्र मंत्रालयाला 12:37 वाजता आली. तांत्रिक अडचणींमुळे पाकिस्तानी बाजूला हॉटलाइन भारतीय बाजूला जोडण्यात सुरुवातीला काही अडचणी आल्या.
ते पुढे म्हणाले, 10 मेच्या सकाळीच आम्ही पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रमुख तळांवर अत्यंत प्रभावी हल्ला चढवला होता. त्यामुळेच ते आता गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यास तयार झाले होते. मी स्पष्ट करू इच्छितो की भारतीय सैन्याच्या सामर्थ्यामुळेच पाकिस्तानला त्यांचा गोळीबार थांबण्यास भाग पाडले गेले.
भारत-अमेरिका व्यापार
अमेरिकेचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना संकेत दिले की, 10 मे पासून पाकिस्तानसोबत शत्रुता थांबवण्याच्या भारताच्या निर्णयावर कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा प्रभाव नव्हता. यापूर्वी ट्रम्प यांनी म्हटले होते की जर भारत आणि पाकिस्तानने शत्रुता थांबवली नाही तर अमेरिका त्यांच्याशी कोणताही व्यापार करणार नाही.
जैस्वाल म्हणाले, 7 मे पासून 'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यापासून ते 10 मे रोजी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याच्या समजुतीपर्यंत, भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये विकसित होत असलेल्या लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा आला नाही.
ते पुढे म्हणाले की, भारताने इतर देशांना हे स्पष्ट केले आहे की 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाण्यांना लक्ष्य केले जात आहे. जर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. तर भारत त्याच पद्धतीने प्रत्युत्तर देईल, असेही इतर देशांना सांगण्यात आले आहे.
जैस्वाल म्हणाले, भारताने ज्या दहशतवादी ठिकाणांना नष्ट केले. ते केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर जगभरातील अनेक निर्दोषांच्या मृत्यूला जबाबदार होते. आता एक नवी सामान्य परिस्थिती आहे. पाकिस्तानला याची जितकी लवकर सवय होईल, तितके चांगले आहे.
