इराणने इस्रायलवर सुमारे 181 मिसाईल्स डागली. हे आपलं मोठं यश असल्याची इराणची धारणा आहे. पण वस्तुस्थिती अशी की इराणला इस्रायलींच्या केसालाही धक्का लावणं जमलेलं नाही. इराणच्या हल्ल्यात एक मृत्यू झाला आहे, मात्र ज्याचा मृत्यू झाला तो इस्रायली नाही तर पॅलेस्टिनी नागरिक आहे. अचानक इराणने इस्रायलवर मिसाइल ॲटॅक केल्यामुळे जगाला आश्चर्याचा धक्का बसला. इराणच्या या कृतीमुळे आज संपूर्ण मिडल ईस्ट युद्धाच्या छायेत आहे. चिंतेची बाब अशी की इस्रायलने अद्याप या हल्ल्यांचं प्रत्युत्तर दिलेलं नाही, त्यामुळे इस्रायलच्या गोटात काय शिजतंय याची कल्पना कुणालाच करता येत नाही.
advertisement
इस्रायलवर केलेला हल्ला ही आपली अभिमानास्पद कामगिरी असल्याच्या भ्रमात इराण असला तरी त्याने इस्रायलला काहीही फरक पडत नाही ही वस्तुस्थिती आहे. इस्रायलच्या मिसाईल डिफेन्स सिस्टिमने इराणच्या बहुतेक मिसाईल्सना हवेतच निकामी केलंय. इराणी हल्ल्यात मोठी जीवितहानीही झालेली नाही. अवघा एक नागरिक मृत्युमुखी पडला आहे, तोही इस्रायली नसून पॅलेस्टिनी आहे.
जेरिको या शहरातील गव्हर्नर हुसैन हमायल यांनी एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार रॉकेटचा तुकडा थेट पॅलेस्टिनी मजुराच्या डोक्यात पडला. समेह अल असाली असं त्याचं नाव असून तो गाझा पट्टीतील जबालिया येथील रहिवासी होता. चार पॅलेस्टिनी नागरिक रॉकेटच्या तुकड्यांमुळे जखमीही झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या अल असालीला तीन मुलं आहेत. त्याच्याकडे इस्रायली वर्क परमिट होतं.
इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर भारतातील इस्रायली राजदूत रेवेन अजार यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. अजार म्हणाले, ‘इराणने 181 मिसाईल्स डागली. त्यात प्रत्येकी 700 ते 1000 किलो स्फोटकं भरलेली होती. त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.’
दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी G-7 देशांमध्ये एक तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात अमेरिकी राष्ट्रपती जो बायडन म्हणाले, ‘आम्ही इस्रायलबरोबर आहोत, मात्र इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर हल्ला करायचं ठरवलं तर तसं करण्यास आमचा पाठिंबा नसेल.’
इराणने डागलेली 181 पैकी 90 टक्के मिसाईल्स निकामी झाल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. 3-3 सुरक्षा चक्र ही त्यांची मिसाइल डिफेन्स सिस्टिम आहेत. या सिस्टिमने इराण हल्ल्यात आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. पहिली सिस्टिम आयर्न डोम आहे. 152 किलोमीटरच्या कक्षेतील 12 किलोमीटर उंचीवरील रॉकेट त्या डोमकडून निकामी केली जातात. डेविडस् स्लिंग ही सिस्टिम 301 किलोमीटरच्या कक्षेतील 49 किलोमीटर उंचावर येणारी रॉकेट्स निकामी करते. तिसरी द एरो ही यंत्रणा पृथ्वीच्या वायुमंडलाबाहेरच मिसाईलचा खात्मा करते. या यंत्रणांनी इराणी हल्ल्यापासून इस्रायलचं रक्षण केलं आहे.
