सिदोने दिलेल्या माहितीनुसार, ती फक्त नऊ वर्षांची असताना आयसिस (ISIS) या संघटनेतल्या दहशतवाद्यांनी तिला पकडलं होतं. तिच्यासोबत तिच्या भावांनाही कैद करून ठेवलं होतं. त्यांच्यासारखे आणखी हजारो जण आयसिसच्या ताब्यात होते. आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांना सिंजर इथून ताल अफारपर्यंत पायी प्रवास करत नेलं होतं. त्यांना तीन दिवस उपाशी ठेवण्यात आलं होतं. नंतर त्यांना भात आणि मांस देण्यात आलं. त्या मांसाची चव खूप विचित्र होती.
advertisement
एका मुलाखतीत सिदो म्हणाली, "मांस आणि भात खाल्ल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखू लागलं. आयसिसच्या दहशतवाद्यांनी त्यांना सांगितलं, की त्यांना यझिदी मुलांचं मांस वाढण्यात आलं होतं. लोकांचा विश्वास बसावा यासाठी त्यांनी काही मुलांचे फोटोदेखील दाखवले होते."
आयसिसने आपल्याला मानवी मांस खाऊ घातल्याचा अनेकांना धक्का बसला होता. काहींचे तर या धक्क्यामुळे जागीच मृत्यूदेखील झाले होते. आयसिसच्या दहशतवाद्यांनी यापूर्वीही अशी क्रूर कृत्यं केली आहेत. 2017मध्ये यझिदी खासदार विआन दाखिल यांनी धक्कादायक माहिती दिली होती. विआन म्हणाले होते, की आयसिसने मानवी मांस खाद्य म्हणून वाढण्याची चुकीची प्रथा सुरू केली आहे.
सिदोने दिलेल्या माहितीनुसार, आयसिसने 200 हून अधिक यझिदी मुलींना कित्येक महिने तळघरात कैद करून ठेवलं होतं. घाणेरडं अन्न आणि पाणी प्यायल्याने अनेक मुलींचा मृत्यू झाला. या तळघरातून बाहेर काढल्यानंतर तिची पाच वेळा विक्री झाली. अबू अमर अल-मकदीसी नावाच्या दहशतवाद्याने तिच्याशी लग्न केलं आणि तिला दोन मुलंदेखील झाली; पण अनेक वर्षांनंतर इस्रायली सैन्याने तिची गाझामधून सुटका केली. त्यानंतर ती आता आपल्या कुटुंबाकडे इराकमध्ये परतली आहे. गाझामध्ये अजूनही अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. अरब मुस्लिम या मुलांना वाढवत आहेत.
