इस्रायली प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, दक्षिण हैफा येथील सीझेरिया परिसरात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचं निवासस्थान आहे. या निवासस्थानाजवळ ड्रोनचा स्फोट झाला. इस्रायली सुरक्षा दलांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे ड्रोन मोकळ्या जागेत पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगितलं जात आहे. आयडीएफचं म्हणणं आहे की, आज सकाळी हैफा परिसरात लेबनानमधून डागलेल्या रॉकेटमुळे वॉर्निंग सायरन वाजले होते.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, थेट लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता या ड्रोनमध्ये होती. इस्रायली सुरक्षा दलांनी कबुली दिली की, हा ड्रोन हल्ला रोखण्यात देशाची हवाई संरक्षण यंत्रणा अपयशी ठरली. हा प्रकार सुरक्षेतील मोठी चूक असल्याचं सुरक्षा दलांनी म्हटलं आहे. कारण, हैफाच्या बाहेरील भागात लष्करी हेलिकॉप्टरच्या शेजारी एक ड्रोन उडत होतं.
इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, लेबनानहून तीन ड्रोन हैफाच्या दिशेने आले होते. त्यापैकी फक्त दोन ड्रोन शोधून काढण्यात आले. तिसऱ्या ड्रोनने सीझेरियातील एका इमारतीवर अचूक हल्ला केला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, त्यामुळे मोठा स्फोट झाला होता.
हे ड्रोन लेबनानमधून सुमारे 70 किलोमीटर अंतरावरून आलं आणि थेट सीझेरियामधील एका इमारतीला धडकलं. ड्रोन इस्रायली हवाईहद्दीत घुसल्यानंतर उत्तर तेल अवीवमधील ग्लिलॉट वस्तीमधील लष्करी तळांवर सायरन वाजू लागले. इस्रायली सैन्याचं असं म्हणणं आहे की, हल्ला करण्यापूर्वी हे ड्रोन एक तास इमारतीवर घिरट्या घालत होतं.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायल सातत्याने हिजबुल्लाहचे तळ आणि प्रमुख नेत्यांना टार्गेट करत आहे. इस्रायलने या संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहचा देखील खात्मा केला आहे.
