जेरुसलेम रस्त्यावरील रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ऑनलाइन प्रसारित झालेल्या व्हिडिओतील दृश्यानुसार, दोन हल्लेखोर रायफलसह रेल्वेतून बाहेर पडले आणि त्यांनी नागरिकांवर गोळीबार सुरू केला. गोळीबार सुरू झाल्यानंतर अनेक नागरिकांनी जमिनीवर झोपून स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. इस्रायली सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना तत्काळ प्रत्युत्तर दिलं.
स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून एक मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 31 मिनिटे) आपत्कालीन सेवांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. डॉक्टरांनी जखमींना तत्काळ उपचार दिले. इस्रायलमध्ये वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे.
advertisement
माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इस्त्रायली सुरक्षा दलांनी दोन्ही हल्लेखोरांना ठार केलं आहे. 'टाईम्स ऑफ इस्रायल'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, खलफ सहर रजब आणि हसन मोहम्मद हसन तमिमी अशी हल्लेखोरांची नावं होती. ते दोघेही वेस्ट बँक येथील हेब्रोनमध्ये राहणारे पॅलेस्टिनी नागरिक होते.
इस्रायल हिजबुल्लाह नेत्यांना मारण्यासाठी लेबनानमध्ये केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून इराणने मिसाईल बॅरेज सुरू केल्यामुळे त्याच मंगळवारी संपूर्ण इस्रायलमध्ये सायरन वाजवून अलर्ट दिला गेला होता. इस्रायलने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि सुरक्षितस्थळी आश्रय घेण्याचं आवाहन केलं होतं.
दैनिक जागरणने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इराण तेल अवीवमधील तीन लष्करी हवाई तळ आणि गुप्तचर मुख्यालयावर हल्ला करेल, अशी सूचना अमेरिकेने इस्रायलला दिली होती. त्यामुळे इराणच्या हल्ल्यापूर्वीच इस्रायलने गुप्तचर विभागाचं मुख्यालय रिकामं केलं होतं. पूर्व सूचना मिळाल्याने इस्रायलने इराणचा हल्ला निष्प्रभ ठरवला.
Keywords -
